नगर जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा; घरगुती बियाण्यांची पेरणी : अवकाळीमुळे बिजोत्पादन वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:30 PM2020-06-17T12:30:10+5:302020-06-17T12:31:42+5:30
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बीजोत्पादन कार्यक्रमाला मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यंदा नगर जिल्ह्यात सोयाबीन, उडीद व मूगाच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
शिवाजी पवार /
श्रीरामपूर : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बीजोत्पादन कार्यक्रमाला मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यंदा नगर जिल्ह्यात सोयाबीन, उडीद व मूगाच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सोयाबीनचे ६० टक्के तर मुगाच्या अवघ्या १२ टक्के बियाण्यांचा पुरवठा होऊ शकला आहे. कर्जत व जामखेड येथे उडदाच्या पेरणीकरिता थेट आंध्र प्रदेशातून बियाणे मागवावे लागत आहे.
महामंडळाकडून शेतक-यांना सोयाबीन, मूग, उडीद पिकांच्या उच्चतम दर्जाचे बियाणे वाजवी दरात पुरविले जाते. महामंडळ शेतक-यांना चांगला दर देऊन पुन्हा ते बियाणे खरेदी करते.
मात्र मागील वर्षी जिल्ह्यात पिकांच्या ऐन काढणीवेळी अवकाळीने तडाखा दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग व उडदाचे उत्पादन वाया गेले. महामंडळाकडे आलेल्या जेमतेम शेतक-यांचे बियाणे गुणवत्तेच्या निकषात नापास ठरले. त्यामुळे ते नाकारण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीला त्याचा फटका बसला आहे.
उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासे, राहाता, कोपरगाव या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी केली जाते. तेथे यंदा वितरकांनी २८ हजार क्विंटल बियाण्याची मागणी केली होती.
प्रत्यक्षात पुरवठा मात्र अवघा १६ हजार क्विंटलपर्यंत होऊ शकला. सुमारे ४० टक्के तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र शेतकºयांनी स्वत:कडील बियाण्यांची पेरणी केल्याने ही उणीव काही अंशी भरून निघाली.
महामंडळाला सोयाबीनच्या ४२ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता होण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ १९ हजार क्विंटल बियाणे पेरणीस पात्र ठरले.
दरम्यान, जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये उडीद व मूगाची पेरणी ब-यापैैकी होते. दक्षिणेमध्ये साडे तीन ते चार हजार क्विंटल उडीदाच्या बियाण्याची मागणी झाली आहे. मात्र महामंडळ दोन हजार क्विंटलचा देखील पुरवठा करण्यास असमर्थ ठरले. दीड हजार क्विंटल बियाण्याची मागणी एकट्या जामखेड तालुक्यातून झाली आहे.
महामंडळाने वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेशातून बियाणे पुरविण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. सुमारे ५०० क्विंटल बियाणे त्यातून उपलब्ध झाले असून आणखी काही प्रमाणात ते मिळेल असा विश्वास महामंडळाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला.मुगाच्या ८०० क्विंटल बियाण्याची मागणी असताना महामंडळाकडून कुठलाही पुरवठा होऊ शकलेला नाही.
सोयाबीनचे दर ७४ रुपयांवर
उत्पादनाअभावी यंदा महामंडळाने अनुदानित सोयाबीन बियाण्यांचा शेतक-यांना पुरवठा केलेला नाही. यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचे दर ६५ रुपये किलोहून ७४ रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना झळ बसली आहे.
शेतक-यांनी स्वत:कडील बियाण्यांची पेरणी करावी याकरिता महाबीजकडून जनजागृती करण्यात आली. एप्रिल व मे महिन्यातील उष्णतेमध्ये प्रयोगशाळेत नापास ठरलेले बियाणे आता हवामानातील बदलामुळे पेरणीयोग्य ठरू शकेल. तशा सूचना शेतक-यांना दिल्या आहेत. त्यामुळे तूट भरून निघेल, असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र जोशी यांनी सांगितले.