लघुपटाची पटकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 02:50 PM2018-09-11T14:50:08+5:302018-09-11T14:50:26+5:30

लघुपटाच्या विषय व कथेबाबत आपण मागील भागात चर्चा केली

Shortcut screen | लघुपटाची पटकथा

लघुपटाची पटकथा

लघुपटाच्या विषय व कथेबाबत आपण मागील भागात चर्चा केली. आज आपण लघुपटाच्या पटकथेबाबत चर्चा करूयात. लघुपटाची पटकथा लिहिताना लेखकाकडे कथा असावी लागते. ती कथा लिहून काढल्यास त्यावर पटकथा तयार करणे सोपे जाते. पटकथा या शब्दासाठी इंग्रजीत ‘स्क्रिप्ट’ व ‘स्क्रीनप्ले’ असे दोन स्वतंत्र शब्द आहेत. दोन्ही शब्दांचा अर्थ पटकथा असा असला तरी त्यामध्ये फरक नक्की आहे. ‘स्क्रिप्ट’ या शब्दाचा अर्थ पटकथा असाच असून यामध्ये कलाकारासाठी आवश्यक असलेले दृश्याचे वर्णन व त्याला अनुसरून असलेले संवाद स्क्रिप्टमध्ये असतात. म्हणजे दृश्याची परिस्थिती कलाकारांना समजेल, त्यासाठी करायची हालचाल व दृश्यामध्ये असलेले संवाद ज्यामध्ये असतात, त्याला ‘स्क्रिप्ट’ असे म्हणतात. याशिवाय नाटक, माहितीपट, रेडिओवरील कार्यक्रम यासाठीही स्क्रिप्ट असाच शब्द वापरतात. परंतु ‘स्क्रीनप्ले’ हा शब्द मात्र फक्त चित्रपटाच्या पटकथेसाठीच वापरतात. स्क्रीनप्ले या शब्दाला मराठीत पटकथा असाच भाषांतरित शब्द असला तरी त्याची रचना वेगळी असते. स्क्रीनप्ले हा प्रोडक्शन टीम अर्थात दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता, प्रकाशयोजनाकार, वेशभूषा व रंगभूषाकार, प्रॉपर्टी पाहणारा, चलचित्र दिग्दर्शक (सिनेमॅटोग्राफर), आदी निर्माता (प्रोडक्शन) टीममध्ये असलेल्या व्यक्तींसाठी लिहिलेली असते. यामुळे दृश्य काय आहे? व संवाद काय आहेत? हे तर कळतेच, पण वेळ कधीची आहे? त्यासाठी प्रकाशाची किती गरज आहे? किती सहाय्यक कलाकारांची आवश्यकता आहे? त्यांचा पोशाख काय असेल? ठिकाण कसे असेल? याबाबत तपशिलाने माहिती लिहिलेली असते. म्हणजेच पडद्यावर सिनेमा कसा दिसेल? हे ज्या पटकथेमध्ये लिहिलेले असते, त्यास इंग्रजीत स्क्रीनप्ले असे म्हणतात. त्यामुळे पटकथाकाराला या दोन्ही प्रकारच्या पटकथेमधील नेमका फरक माहिती हवा. एखादा पटकथाकार कथेचे पटकथेत रूपांतरण करताना तो स्क्रिप्ट लिहित असतो.
पुढे दिग्दर्शक हा पटकथाकाराच्या मदतीने त्याचे स्क्रीनप्लेमध्ये रुपांतरण करतो. यावेळी चलचित्र दिग्दर्शक त्यांच्या बरोबर असल्यास स्क्रीनप्ले अधिक उत्तम होतो. एखादे दृश्य चित्रित करण्यासाठी आवश्यक असलेली अडचण, पूर्व तयारी व त्यासाठी लागणारी इतर सामुग्री चलचित्र दिग्दर्शक सुचवू शकतो. कथेचे पटकथेत व दृश्यात रूपांतरण करताना पटकथाकाराने काही प्रश्नांची उत्तरे त्याने स्वत: दिली पाहिजेत. यामध्ये कोण?, का?, कधी?, कोठे?, केव्हा?, कसे? आदी प्रश्नांची उत्तरे कोणतेही दृश्य निर्माण करताना त्याने दिली पाहिजेत. एखाद्या दृश्याची निर्मिती करताना त्याची कथेसाठी का गरज आहे? हे पाहिले पाहिजे. सदर दृश्य कथेत नेमका कोणता चांगला परिणाम साधू शकते? त्या दृश्यातील कलाकार, संवाद असेच का हवे आहेत? संवाद कोणाच्या तोंडी आहेत? नेमका संवाद काय हवा? सदर दृश्याचे स्थळ नेमकेपणाने कोणते हवे? स्थळ बदलल्यास काय फरक पडू शकतो? इत्यादी प्रश्नाची उत्तरे पटकथाकाराला देता आली पाहिजेत.
म्हणजेच पटकथाकार दृष्याबाबत जितके जास्त प्रश्न उपस्थित करेल तितकी उत्तम पटकथा निर्माण होण्यास मदत होईल. कारण चांगल्या चित्रपटात कोणतेही दृश्य विनाकारण येत नाही. त्याचा संबंध पुढील किंवा मागील घटनाशी असावाच लागतो. केवळ स्थळ आवडले, संवाद चांगला आहे किंवा एखाद्या कलाकाराला संवाद कमी आहेत म्हणून विनाकारण दृष्यांची निर्मिती होत नाही. पटकथाकाराला प्रत्येक दृश्याचे महत्त्व, त्याचा कार्यकारणभाव व इतर त्या दृश्याचा असलेला असलेला संदर्भ सांगता आलाच पाहिजे.

- प्रा.बापू चंदनशिवे 

 

Web Title: Shortcut screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.