साईनगरीतील श्रीरामनवमी उत्सव भक्तांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:54+5:302021-04-22T04:20:54+5:30

श्रीरामनवमी उत्सव म्हणजे लाखो भाविकांची उपस्थिती, साईनामाचा गजर, ढोल-ताशांचे आवाज, फटाक्यांची आतषबाजी, फुले, गुलालाची उधळण, रथ मिरवणुकीत भाविकांच्या उत्साहाला ...

Shri Ram Navami festival in Sainagari without devotees | साईनगरीतील श्रीरामनवमी उत्सव भक्तांविना

साईनगरीतील श्रीरामनवमी उत्सव भक्तांविना

श्रीरामनवमी उत्सव म्हणजे लाखो भाविकांची उपस्थिती, साईनामाचा गजर, ढोल-ताशांचे आवाज, फटाक्यांची आतषबाजी, फुले, गुलालाची उधळण, रथ मिरवणुकीत भाविकांच्या उत्साहाला येणारे उधाण, कावडीने गोदाजल आणून साईसमाधीला घालण्यात येणारे स्नान अशा कार्यक्रमातून भाविकांना मिळणारा आनंद यंदाही कोरोनाने हिरावून घेतला.

यंदाचा रामनवमी उत्सव मंदिरातील चार भिंतीच्या आत सुरू आहे. द्वारकामाईतील अखंड पारायणाची बुधवारी सकाळी सांगता झाली. यानंतर द्वारकामाईतून गुरुस्थानमार्गे समाधी मंदिरात मिरवणूक काढण्यात आली. यात संस्थानचे प्रभारी सीईओ रवींद्र ठाकरे यांनी विणा, मुख्यकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी ग्रंथ, तर वैद्यकीय अधिकारी डॉ. राम नाईक व डॉ. अविनाश जाधवर यांनी साईप्रतिमा धरून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व पुजारी उपस्थित होते.

रवींद्र ठाकरे व वैशाली ठाकरे यांच्या हस्ते साईसमाधीची पाद्यपूजा करण्यात आली. यानंतर द्वारकामाईतील गव्हाच्या पोत्याचे पुजन करून ते बदलण्यात आले. द्वारकामाईवरील पारंपरिक निशाणे व लेंडीबागेतील शताब्दी ध्वज बदलण्यात आला.

मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे श्रीरामजन्मावर कीर्तन झाले. मध्यान्ह आरतीपूर्वी १२ वाजता कीर्तनानंतर समाधी मंदिरात डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे व वैशाली ठाकरे यांच्या हस्ते श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदिरप्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते.

दरवर्षी मुंबईच्या द्वारकामाई मंडळातर्फे देखावे उभारले जातात. गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे याला फाटा देण्यात आला आहे. यंदा मात्र परभणी येथील जीवन कौशल्य आर्टच्या १२ कलाकारांनी चाळीस तास परिश्रम घेऊन श्रीराम व श्रीसाईबाबा यांच्या चार भव्य रांगोळ्या साकारल्या. शिंगवे येथील नीलेश नरोडे व शिर्डीतील ओमसाई इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात देणगी स्वरूपात आकर्षक विद्युत रोषणाई केली. हुबळीचे साईभक्त बी. एस. आमली यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

Web Title: Shri Ram Navami festival in Sainagari without devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.