श्रीगोंदा, कर्जत येथे कडकडीत बंद, पवारांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:44 PM2019-09-26T14:44:25+5:302019-09-26T14:54:37+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’मार्फत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुरुवारी श्रीगोंदा, कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
श्रीगोंदा/कर्जत - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’मार्फत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुरुवारी (26 सप्टेंबर) श्रीगोंदा, कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.
कर्जत येथे सकाळपासूनच बंद पाळण्यात आला. येथील व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. शाळा, महाविद्यालयेही बंद होती. दुपारी बाराच्या सुमारास येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. शरद पवारांवर ‘ईडी’ने दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा. राजकीय आकसातून ही कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी थांबवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीगोंदा येथे सकाळपासूनच येथील व्यापारी, व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के, ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, या प्रकरणाशी शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. भाजप सरकारने केवळ निवडणूका डोळ्यापुढे ठेऊन ही कारवाई केली आहे. लवकरात लवकर गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला.
शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि 70 लोकांवर ईडीमार्फत गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामती, मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विविध भागात या याचे पडसाद उमटत आहेत. 'टायगर अभी जिंदा है... पवार साहेब तुम संघर्ष करो.. हम तुम्हारे साथ है..' अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज परळी बंदचे आवाहन केले आहे. यास प्रतिसाद देत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सरकारने केलेली कारवाई सुडबुद्धीची असून याच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बंद पुकारण्यात आला.