श्रीगोंदा फॅक्टरीचा परिसर ८ जूनपर्यंत सील; संपर्कातील १४ व्यक्तींना नगरला पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:45 AM2020-05-26T10:45:48+5:302020-05-26T10:47:11+5:30
श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा तालुका प्रशासनाने श्रीगोंदा फॅक्टरी स्टेशन गेट ते ढोकराई फाट्यापर्यंतचा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे, अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात १४ जण आले होते. त्यांना तपासणीसाठी नगरला पाठविले आहे.
श्रीगोंदा : श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा तालुका प्रशासनाने श्रीगोंदा फॅक्टरी स्टेशन गेट ते ढोकराई फाट्यापर्यंतचा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे, अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात १४ जण आले होते. त्यांना तपासणीसाठी नगरला पाठविले आहे.
सदर क्षेत्रातील सर्व आस्थापना, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री २६ मे रोजी रात्री १२ वाजेपासून ते ८ जून २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर क्षेत्रातून नागरिकांचे आगमन व प्रस्थान करणे व सदर क्षेत्रातून वाहनांच्या आगमनास प्रतिबंधित करण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांची जबाबदारी नोडल प्रतिनिधी नेमणूक करण्यात आली आहे. दूध, किराणा,भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू याबाबत नियोजन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्याकडे सनियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्यामार्फत असणार आहे. सदर प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्तींना आपत्कालीन परिस्थितीत आत किंवा बाहेर जायचे असल्यास त्याचे अधिकार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे, असेही तहसीलदार माळी यांनी सांगितले.