श्रीगोंदा-घोडेगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपासून ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:22+5:302021-05-25T04:23:22+5:30
आढळगाव : श्रीगोंदा ते घोडेगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेमध्ये असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. निधी मंजूर ...
आढळगाव : श्रीगोंदा ते घोडेगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेमध्ये असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. निधी मंजूर असूनही काम अपूर्ण ठेवणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने पार पाडण्याची गरज आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोरोना संकटामध्येही रस्त्याची कामे सुरू असताना या कामाला होणारा विलंब अनाकलनीय आहे.
श्रीगोंदा ते घोडेगाव या रस्त्याच्या अडीच किलोमीटर टप्प्यासाठी मजबुतीकरण आणि अस्तरीकरणासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्यावरील वाहतुकीची संख्या जास्त असून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाला जाण्याचा हा मार्ग आहे. या मार्गावरून ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. श्रीगोंद्यावरून कर्जतला जाण्यासाठी या मार्गाला वाहनधारकांची पसंती असते. अनेक अर्थांनी या मार्गाचे महत्त्व आहे.
रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून राज्य सरकारने या रस्त्यासाठी निधी मंजूर केला. ऑनलाईन निविदा प्रक्रियेमधून काम वाटप झालेल्या संबंधित ठेकेदार एजन्सीला प्रारंभ आदेश मिळाल्यानंतर काम सुरू झाले. सुरुवातीला वेगात सुरू असलेले काम अचानक बंद पडले. पुढे कोरोनाच्या संकटाचे आपसूक कारण मिळाले. पहिले लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतरही काम सुरू झाले नाही. आता ब्रेक द चेनमध्ये अन्य रस्त्यांची कामे सुरू असताना या कामाला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल घोडेगाव ग्रामस्थांसह अन्य वाहनधारकांमधून विचारला जात आहे.
--
श्रीगोंदा ते घोडेगाव रस्त्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदार एजन्सीकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. त्यांचा प्रतिसाद नसल्यामुळे ठेकेदार एजन्सीवर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे.
-अरविंद अंपाळकर,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीगोंदा.