श्रीगोंद्यात आघाडीचे महिला राज
By Admin | Published: September 14, 2014 11:11 PM2014-09-14T23:11:23+5:302024-03-26T15:13:03+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अर्चनाताई दत्तात्रय पानसरे तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संध्या मनेश जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे
श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अर्चनाताई दत्तात्रय पानसरे तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संध्या मनेश जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपाचे आ.बबनराव पाचपुते गटाला धक्का बसला.
सभापतीपदासाठी अर्चना पानसरे यांच्या नावाची सूचना मीना देवीकर, बाळासाहेब नाहाटा, हरिदास शिर्के यांनी तर उपसभापतीपदासाठी संध्या जगताप यांच्या नावाची सूचना अनुराधा नागवडे, छाया कुरूमकर, बाळासाहेब मनसुके यांनी मांडली.
निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भोर यांनी निवडीची अधिकृत घोषणा करताच दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पंचायत समितीत काँग्रेसचे ६, राष्ट्रवादीचे ५ तर भाजपाचा १ सदस्य. त्यामध्ये विद्यमान सभापती अर्चना पानसरे, माजी उपसभापती हरिदास शिर्के, बाळासाहेब मनसुके यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचपुतेंबरोबर महेंद्र वाखारे, राजेंद्र पाचपुते हे दोन सदस्य राहिले आहेत. भाजपाचे राजेंद्र म्हस्के व काँग्रेसच्या सदस्या अनुराधा ठवाळ यांनी तळ्यात मळ्यात भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा उपसभापतीपदाची संधी मिळाली नाही.
निवडीपूर्वी सकाळी ७ वाजता राष्ट्रवादीच्या अर्चना पानसरे, हरिदास शिर्के, बाळासाहेब मनसुके हे तीन सदस्य आ. अरुण जगताप यांच्या निवासस्थानी आले. शिवाजीराव नागवडे, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार, प्रा.तुकाराम दरेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात अर्चना पानसरे, संध्या जगताप यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
(तालुका प्रतिनिधी)