श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक : सेनेचे बारा मावळे मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:27 PM2019-01-15T12:27:31+5:302019-01-15T12:28:55+5:30
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सेनापतींनी तोडीस तोड उमेदवार उभे केले आहेत.
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सेनापतींनी तोडीस तोड उमेदवार उभे केले आहेत. सेनापतींनी आपल्या तलवारी धारदार करून एकमेकांवर वार करीत घमासान लढाई सुरू केली असली तरी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणारे सेनेचे नेते घनश्याम शेलार यांनी नगरपालिका निवडणुकीत उतरल्याचे दिसत नाही.
२७ जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षा व नगरसेवक पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मात्र शिवसेनेने २० पैकी फक्त १२ जागांवर आपले मावळे उभे केले आहेत. सर्व जागांवर मावळे उभे केले नाहीत की शेलारांनी उमेदवार उभे करताना लक्ष दिले नाही का? अशा प्रश्न निर्माण होत आहे.
आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर व भाजपाचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब नाहाटा, पोपटराव खेतमाळीस यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच बैठका सुरू केल्या आहेत. भाजपमधील निष्ठावंतांनी दत्तात्रय हिरणावळे यांच्या घरी बैठक घेऊन संभाजी ब्रिगेड प्रहारशी गठबंधन करण्याचा पवित्रा घेतला आहे मात्र सेनेच्या गोटात शांतता दिसत आहे.
घनश्याम शेलार हे प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे नेते आहेत पण अचानकपणे शांत झाले आहेत. त्यामुळे राजकीय वतुर्ळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही जाणकारांचे मते शेलार यांना उध्दव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी धनुष्यबाण तयार ठेवण्याचे आदेश केले आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर विरोधकांची नाराजी नको शेलारांनी सावध भूमिका घेतली असावी. शेलारांनी आता घेतलेली सावध भुमिका त्यांना लोकसभा साठी फायदेशीर होऊ शकते. मात्र आता श्रीगोंदा नगरपालिकेच्या मैदानात धनुष्यबाण हाती घेतलेल्या मावळ्यांचे काय होणार असाही प्रश्न आहे.