श्रीगोंदा पंचायत समिती दालनात भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:30 PM2019-07-03T14:30:29+5:302019-07-03T14:30:38+5:30
शेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकायदाक बनली आहे.
श्रीगोंदा : शेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकायदाक बनली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मंगळवारी (दि.२) पालक, ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या दालनातच शाळा भरविली.
आम्हाला दररोज झाडाखाली बसून शिकावे लागते. पण पंचायत समितीची इमारत किती छान आहे. असे वाटते दररोज पंचायत समितीत शाळा भरावी आणि वातानुकूलित सभागृहात बसून भोजन करावे, अशी भावना शेडगाव शाळेतील चिमुकल्यांनी व्यक्त केली. राज्य बाजार समिती महासंघाचे संचालक बाळासाहेब नाहाटा, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, सरपंच विजय शेंडे यांनी पंचायत समिती प्रशासनाने नवीन इमारत बांधावी, अशी मागणी केली.जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर यांनी फोन करून दोन शाळा खोल्या मंजूर करून देते आंदोलन मागे घ्या, असे पत्र पाठवले होते.
या आंदोलनाची गटविकास अधिकारी प्रशांत काळे व गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी गांभीर्याने दखल घेतली. शेडगाव शाळा इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर होऊन नवीन तीन वर्ग खोल्या होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधल्याचे सांगितले.
आम्ही मेल्यावर इमारत होईल का?
दोन वर्षापासून आम्ही झाडाखाली बसून शिकत आहोत. साहेब, पुढारी येतात आणि शाळेची पाहणी करतात. खोटी आश्वासने देतात. शासन शाळा इमारत आम्ही मेल्यावर बांधणार का? असे खडे बोल श्रद्धा शेंडे या विद्यार्थिनीने सुनावले.
श्रीगोंदा तालुक्यातील धोकादायक शाळा इमारतींपैकी ५० शाळांचे निर्लेखन प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवले आहेत. यामध्ये शेडगाव शाळेचा प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करून घेणार आहे. त्यानंतर तीन नवीन शाळा खोल्या मंजूर करून लवकरात लवकर काम कसे सुरू होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. -प्रशांत काळे, गटविकास अधिकारी