शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा श्रीपाद छिंदम तुरुंगाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 08:35 PM2018-03-13T20:35:44+5:302018-03-14T05:59:01+5:30
शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम यास जामीन मंजूर झाल्याने मंगळवारी त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली़ पोलिसांनी त्याला बंदोबस्तात पुण्यापर्यंत सोडले. तेथून तो परराज्यात गेल्याचे समजते. न्यायालयाच्या आदेशानुसार छिंदमला दर रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात हजेरी द्यायची आहे. महानगरपालिकेतील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी १६ फेब्रुवारीला फोनवरून बोलताना छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. श्रीपाद छिंदम याच्यावर गुन्हा दाखल झाला होता़ जिल्हा न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला नाशिक कारागृहात हलविण्यात आले होते़ ९ मार्चला न्यायालयाने जामीन मंजूर केला़ सोमवारी न्यायालयात कागदपत्रांची पूर्तता झाली.
शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान श्रीपाद छिंदमने केले होते. तेव्हा नगरचा उपमहापौर असून त्याच्या विधानाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.यामुळे जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि छिंदमला उपमहापौरपदावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्याला अटकही करण्यात आली होती.
दरम्यान छिंदमने त्याच्यावरील सर्व आरोप नाकारात मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह काही बोललोच नव्हतो. माझ्यावर राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याचे न्यायालयात सांगितले. अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी छिंदमला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. छिंदम याने स्वत:च न्यायालयात ०६ मार्च रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी (दि.०९) सुनावणी झाली होती.
छिंदम याने स्वत:वरील आरोप नाकारले असून फिर्यादीबरोबर राजकीय वाद असल्याने माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, अशी भूमिका छिंदम याने न्यायालयात मांडली. तसेच आई आजारी असून तिची देखभाल करायची आहे. मी कुटुंबातील कर्ता असल्याने माझा जामीन मंजुर करावा, असा युक्तीवाद केला. वकील नसल्यामुळे छिंदम याने स्वत:च न्यायालयात त्याची बाजू मांडली. सुरुवातीला गुन्ह्याची कबुली देणा-या छिंदमने न्यायालयात मात्र, सर्व आरोप नाकारत घुमजाव केले. मी ते वक्तव्य केलेच नसल्याचे छिंदम याने न्यायालयात सांगितले होते.