शिवाजी महाराजांचा अपमान करणा-या छिंदमचं नगरसेवकपद रद्द, ठराव एकमताने मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 03:38 PM2018-02-26T15:38:14+5:302018-02-26T15:40:23+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या भाजपाच्या निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे

Shripad Chindam's councilor post cancelled | शिवाजी महाराजांचा अपमान करणा-या छिंदमचं नगरसेवकपद रद्द, ठराव एकमताने मंजूर

शिवाजी महाराजांचा अपमान करणा-या छिंदमचं नगरसेवकपद रद्द, ठराव एकमताने मंजूर

अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या भाजपाच्या निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. श्रीपाद छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यासोबतच छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला आहे. श्रीपाद छिंदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठरावाला सर्वपक्षीय सदस्यांनी महासभेत हात उंचावून पाठिंबा दिला. 

शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भाजपाच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगरमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले होते. यानंतर छिंदम याने माफीही मागितली होती, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. 

नेमकं प्रकरण काय?
छिंदमने मनपा बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. खड्डे बुजविण्याच्या कामासाठी काल माणसे का पाठविली नाहीत, याची विचारणा केली होती. शिवजयंती झाल्यानंतर माणसे पाठवितो, असे बिडवे म्हणाले होते. त्यानंतर शिवाजी महाराज व शिवजय़ंतीबाबत छिंदम यांनी अपशब्द वापरले.
बिडवे यांच्याशी बोलताना छिंदम यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले. या संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले होते. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, संभाजी कदम, अनिल शिंदे, योगीराज गाडे यांच्यासह शिवसैनिकांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून छिंदम यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्याचवेळी छिंदम यांचे कार्यालय व घरासमारे शिवसैनिक, राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालयाची तोडफोड करत गाड्या फोडल्या. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.  उपमहापौर छिंदम यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली होती. खासदार दिलीप गांधी यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली होती. 
 

Web Title: Shripad Chindam's councilor post cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.