श्रीराम मंदिराच्या भुखंडाचा वनवास : नवीन भाडेकरु गावगुंड असल्याने जुन्यांना प्राधान्य
By सुधीर लंके | Published: October 12, 2018 10:56 AM2018-10-12T10:56:54+5:302018-10-12T10:58:10+5:30
शेवगावच्या श्रीराम मंदिराचे भूखंड काही नवीन भाडेकरुंना भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रयत्न झाला.
सुधीर लंके
अहमदनगर : शेवगावच्या श्रीराम मंदिराचे भूखंड काही नवीन भाडेकरुंना भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रयत्न झाला. पण, नवीन भाडेकरु चारित्र्यहीन व गावगुंड असल्याने जुन्याच भाडेकरुंना प्राधान्य देण्यात येते, असा अजब दावा विश्वस्तांनी धर्मादाय कार्यालयाकडील चौकशीत केला आहे. परमीटरुम व बिअरबार चालविणाऱ्या भाडेकरुंबाबत मात्र विश्वस्तांना व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयालाही काहीही आक्षेप नाही हे विशेष.
श्रीराम मंदिराच्या विश्वस्त ट्रस्टला देवस्थानच्या देखभालीसाठी ३१ एकरचा भूखंड इनाम म्हणून मिळाला आहे. देवस्थानच्या देखभालीचा खर्च भागविण्यासाठी या विश्वस्तांनी ५१ हून अधिक भाडेकरुंना भूखंड भाड्याने दिले आहेत. भूखंड भाडेकराराने देण्यासाठी लिलाव, जाहिरात अथवा निविदा यापैकी कोणती पद्धत अवलंबली जाते याचा स्पष्ट उल्लेख चौकशी अहवालात नाही. नवीन भाडेकरु गावगुंड निघतात. ते जास्त भाडे देत नाहीत. ते पुन्हा नवीन बांधकाम करण्याचा व अतिक्रमण करण्याचा धोका असल्याने जुन्याच भाडेकरुंसोबत पुन्हा पुन्हा करार करतो, असे उत्तर विश्वस्तांनी चौकशीत दिले आहे. कोणते भाडेकरु गावगुंड निघाले याचा मात्र काहीही उल्लेख अहवालात नाही. चौकशी निरीक्षक ज्ञा. शि. आंधळे यांनीही तशी शहानिशा केलेली दिसत नाही.
भाडेकरुंनी कोणता व्यवसाय करावा हे तपासण्याची जबाबदारी विश्वस्तांची नाही, असे अहवालात स्पष्टपणे नमूद आहे. देवस्थानच्या भूखंडांवर भाडेकरु त्यांच्या खर्चाने बांधकाम करु शकतात, असेही विश्वस्तांचे म्हणणे आहे. देवस्थानच्या जागेत कोणी बांधकाम करत असेल तर त्यासाठी विश्वस्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. हे बांधकाम नियमानुसारही हवे. त्यासाठी स्थानिक प्राधिकरणाचा बांधकाम परवाना हवा. या सर्व बाबी तपासण्याची जबाबदारी विश्वस्तांची असताना त्यांनी याबाबत सरळ हात वर केलेले दिसतात. चौकशी निरीक्षकांनीही याकडे दुर्लक्ष केलेले दिसते. याऊलट नगरपरिषदेने करवसुलीच्या नोंदी केल्या म्हणजे ही बांधकामे अधिकृत आहेत, असा सोयीस्कर अर्थ निरीक्षक आंधळे यांनी काढला आहे. बांधकाम अधिकृत आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाला नाही. असे असतानाही त्यांनी हा अभिप्राय नोंदविला आहे.
धर्मादाय आयुक्त हे देवस्थानांच्या जमिनीचे काळजीवाहक असतात. त्यामुळे या कार्यालयाने या जागांच्या वापराकडे लक्ष देणे आवश्यक असतानाही केवळ वरवर चौकशी करुन ती दप्तरी दाखल केल्याचे दिसते.
पाच मुलींना सायकल वाटप
देवस्थानने भाड्याने दिलेल्या भूखंडाच्या पैशातून श्रीराम मंदिर न्यासामार्फत सामाजिक कामे केली जातात असा दावा विश्वस्तांनी केला आहे. सामाजिक कामांची जी यादी अहवालात आहे त्यात आजवर पाच गरजू मुलींना सायकल वाटप केल्याचे म्हटले आहे. दरवर्षी रक्तदान शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, श्लोक पाठांतर असे कार्यक्रम घेतले जातात, असा विश्वस्तांचा दावा आहे. लाखमोलाचे भूखंड भाडेपट्ट्याने देऊन हे उपक्रम राबविले जातात.
एकाच भाडेकरुला भूखंड
ब्रिजलाल बाहेती यांना एक एकर क्षेत्र १९८७ ते २०६७ एवढ्या कालावधीसाठी भाड्याने देण्यात आल्याचे दिसते. या जागेवर ते शोरुम चालवितात. या भाड्यापोटी ते दरवर्षी साडेचार हजार रुपये भाडे देतात असे अहवालात म्हटले आहे. त्यांनाच साडेबारा हजार चौरस फूट भूखंड १९८८ ते २०६८ या कालावधीसाठी भाड्याने देण्यात आल्याचे दिसते. मुकुंद फडके यांना ८ गुंठे भूखंड २०७४ पर्यंत तर डॉ. विकास कांबळे यांना साडेनऊ गुंठे भूखंड २०८२ पर्यंत भाड्याने देण्यात आलेला आहे.
बदल अर्ज नसतानाही दुर्लक्ष
भाडेकरुंनी देवस्थानच्या मालमत्तेवर जे बांधकाम केले त्याबाबत विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला कळविले होते का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र, याबाबत चौकशीत उल्लेख नाही. बांधकामाबाबत विश्वस्तांनी बदल अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे, असे मात्र चौकशी निरीक्षकांनी नमूद केले आहे. मात्र, असे अर्ज आलेले नसतानाही ठपका ठेवलेला नाही हे विशेष. त्यामुळे या अहवालात देवस्थानला पाठिशी घालण्यात आल्याचा संशय निर्माण झाला आहे.
हे आहेत न्यासाचे विश्वस्त
श्रीराम मंदिर न्यासावर सध्या अध्यक्ष म्हणून अरुण भालचंद्र गालफाडे कार्यरत आहेत. दत्तात्रय त्र्यंबक गालफाडे, लक्ष्मीकांत दत्तात्रय गालफाडे, प्रकाश भालचंद्र गालफाडे, मोहन अनंत पोतनीस हे विश्वस्त मंडळ सध्या या न्यासावर कार्यरत आहे.
(क्रमश:)