श्रीरामपुरात दरोडा; पाच लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:24 PM2018-05-18T15:24:08+5:302018-05-18T15:26:23+5:30
बोरावके महाविद्यालयाशेजारी राहणाºया ए.पी.शाह यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला.
श्रीरामपूर (जि.अहमदनगर): येथील बोरावके महाविद्यालयाशेजारी राहणाºया ए.पी.शाह यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या दरोड्यात घरातील महिला व पहारेकºयाच्या तोंडात बोळे कोंबून त्यांना बांधून टाकून सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला.
स्वामी विवेकानंद गृहनिर्माण संस्थेत ए.पी.शाह यांचा बंगला आहे. शुक्रवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान दर्शनी भागाच्या दरवाजाचा कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून अज्ञात ५ चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. शाह हे बाहेरगावी गेलेले होते. त्यांच्या पत्नी भारती, नातू व सून झोपलेल्या होत्या. घराबाहेर झोपलेला पहारेकरी भागवत चव्हाण (रा.गोंधवणी, ता.श्रीरामपूर) याच्या तोंडात बोळा कोंबत दरोडेखोरांनी त्यास बांधून ठेवले. घरात प्रवेश करताच आवाजामुळे भारती या जाग्या झाल्या. दरोडेखोरांनी महिलांचीही तीच गत केली. कपाटातील सोने चांदीच्या दागिने व रोख रकमेसह सुमारे ५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
पहारेकरी चव्हाण यांनी दरोडेखोर हे चार ते पाच जण असल्याचे सांगितले. आरडाओरडा करू नये म्हणून दोघांनी धाक दाखविला. घरातील कपाटाची व सामानाची उचकापाचक केली. कपाटामधील सोन्याचे सुमारे १५-२० तोळे दागिने, रोख रक्कम व चांदीचे दागिने असा सुमारे ५ लाखाचा ऐवज लुटला. यापेक्षाही अधिक ऐवज चोरीस गेला असण्याची शक्यता आहे. अशोक शाह आल्यानंतरच चोरीचा तपशील स्पष्ट होणार आहे. एक ते दीड तास घरात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू होता. शहर पोल्सििांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.
श्वानपथकाव्दारे तपास
दरोड्याच्या तपासासाठी नगरहून श्वानपथक व ठसेतज्ज्ञ तातडीने आले. श्वानाने प्रवरा कालव्यापर्यंत माग काढला. तेथून दरोडेखोर पसार झाल्याचा अंदाज आहे. भारती शाह यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात ४-५ दरोडेखोरांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.