श्रीरामपुरात प्रशासन उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:14 AM2021-02-22T04:14:16+5:302021-02-22T04:14:16+5:30
श्रीरामपूर : शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेशिस्तपणाला आवर घालण्यासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस ...
श्रीरामपूर : शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेशिस्तपणाला आवर घालण्यासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस उपअधीक्षक गेली दोन दिवस शहरात पायी फिरून नागरिकांना मास्क वापरण्याची सक्त सूचना देत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या उपस्थित शुक्रवारी मुख्य प्रशासकीय इमारतीत बैठक घेण्यात आली होती. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्याकरिता कडक उपाययोजना हाती घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शनिवार व रविवार दोन दिवस प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक संजय सानप, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहरात पायी फिरून दंडात्मक कारवाई केली.
या पथकाने बसस्थानकात जाऊन नागरिकांना व प्रवाशांना मास्क वापरण्याच्या सूचना केल्या. विनामास्क प्रवाशांना एसटीचा प्रवास नाकारावा असे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिले. मास्क न वापरणाऱ्या शहरातील काही दुकानदारांकडून शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला.
अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे बेशिस्त नागरिकांना चाप बसला. त्यामुळे सकारात्मक बदल दिसून आला. रविवारीसुद्धा पोलिसांची गस्त सुरू होती.
----------