बडतर्फ वैद्यकीय अधिकाऱ्याला श्रीरामपूर भूषण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:22 AM2021-09-27T04:22:18+5:302021-09-27T04:22:18+5:30

श्रीरामपूर : येथील आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पर्हे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई होऊनही नगरपालिकेच्या श्रीरामपूर भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव ...

Shrirampur Bhushan Award to Medical Officer from Badat | बडतर्फ वैद्यकीय अधिकाऱ्याला श्रीरामपूर भूषण पुरस्कार

बडतर्फ वैद्यकीय अधिकाऱ्याला श्रीरामपूर भूषण पुरस्कार

श्रीरामपूर : येथील आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पर्हे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई होऊनही नगरपालिकेच्या श्रीरामपूर भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी डॉ. पर्हे यांना बडतर्फ करून पालिका मुख्याधिकाऱ्यांना त्याबाबत कळविले होते. मात्र, तरीही पालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा पोलीस प्रमुखांच्या हस्ते डॉ. पर्हे यांना गौरविण्यात आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सचिन पर्हे हे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त होते. त्यांची तडकाफडकी सेवा खंडित करण्याचे आदेश जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी १ सप्टेंबरला बजावले. या कारवाईचे पत्र श्रीरामपूरचे तालुका आरोग्य अधिकारी तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाही देण्यात आले होते.

मात्र, असे असले तरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी प्रदान करण्यात आलेल्या श्रीरामपूर भूषण पुरस्कारात डॉ. पर्हे यांना सन्मानित करण्यात आले. कोविड काळात उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा गौरव केला गेला. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यावेळी प्रमुख पाहुणे होते. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या उपस्थितीत शहरातील इतर मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले.

कंत्राटी व पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत डॉ. पर्हे यांनी स्वत:चा खासगी व्यवसाय सुरूच ठेवला होता. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील नियमानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा खासगी व्यवसाय करता येत नाही. डॉ. पर्हे यांच्याविरोधात जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यामुळे तक्रार प्राप्त झाली होती. त्याच्या चौकशीकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. शिंदे यांनी चौकशी करून अहवाल सादर करताच त्यावरून डॉ. पर्हे यांना बडतर्फचे आदेश मिळाले.

महिनाभरापूर्वी झालेल्या कारवाईचा पालिकेच्या मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना विसर पडावा याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. बडतर्फ व्यक्तीला इतर मान्यवरांच्या पंक्तीत गौरविले गेले. जिल्हा पोलीस प्रमुखांनाही यावेळी अंधारात ठेवण्यात आले.

------------

डॉ. सचिन पर्हे हे स्वत:चा खासगी व्यवसाय करतात हे काही लपून राहिलेले नाही. संपूर्ण शहराला ते माहिती होते. पालिकेच्या शेजारीच त्यांचा खासगी व्यवसाय सुरू होता. त्यामुळे सेवा नियमावलीचा भंग झाला.

डॉ. मोहन शिंदे,

तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी.

----------

Web Title: Shrirampur Bhushan Award to Medical Officer from Badat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.