श्रीरामपूरला १० नवीन वीज उपकेंद्र
By Admin | Published: June 2, 2014 12:25 AM2014-06-02T00:25:54+5:302014-06-02T00:37:32+5:30
श्रीरामपूर: आगामी ३ वर्षांच्या विद्युत भार मागणीचा विचार करून पायाभूत आराखडा-२ तयार करण्यात आला आहे.
श्रीरामपूर: आगामी ३ वर्षांच्या विद्युत भार मागणीचा विचार करून पायाभूत आराखडा-२ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार १० नवीन वीज उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार असल्याचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले. महावितरणच्या अधिकार्यांसमवेत आ. कांबळे यांनी चार उपविभागांतर्गत श्रीरामपूर, राहुरी व राहाता तालुक्यातील गावांमधील विद्युत व्यवस्थेची आढावा बैठक घेतली. वळदगाव, चांदेगाव, मांजरी आदी ठिकाणी ३३/११ के. व्ही. उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. टाकळीभान, भोकर, बेलापूर, पाथरे, कोल्हार, आंबी येथे ५ एम.व्ही.ए. पॉवरचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. श्रीरामपूर एम.आय.डी.सी., सूतगिरणी, हरेगाव, मातापूर, टाकळीभान, देवळालीप्रवरा, आंबी, टाकळीमियाँ या उपकेंद्रांची क्षमता वाढ केली जाणार आहे. श्रीरामपूर, राहुरी व देवळालीप्रवरा या उपविभागात नवीन वीज जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. आराखड्यानुसार सध्या असलेल्या २५ उपकेंद्रांचा भार विभागला जाईल. नवीन ११ के.व्ही. ए. विद्युत वाहिन्यांमुळे वाहिन्यांवरील भार कमी होईल. योग्य दाबाने वीज पुरवठा होऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी होईल. ज्या भागातील वसुली जास्त असेल, त्या भागात आराखड्याची प्राधान्याने अंमलबजावणी केली जाईल, असे कार्यकारी अभियंता संतोष सांगळे यांनी बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)