श्रीरामपुरात गावपातळीवरील टोकाच्या संघर्षाला मिळाला पूर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:26+5:302021-01-18T04:18:26+5:30
बेलापूर येथे पोलिसांनी मतदान केंद्राच्या आत प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने वाद होऊन रास्तारोको करण्यात आला. मात्र, वरिष्ठ ...
बेलापूर येथे पोलिसांनी मतदान केंद्राच्या आत प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने वाद होऊन रास्तारोको करण्यात आला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चेतून लगेचच वाद मिटविला. इतरत्र मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान केंद्रांवर दोन्ही गटांतील प्रमुख पदाधिकारी मतदारांना मतदानासाठी आवाहन करताना दिसले. मात्र, पूर्वीची विरोधाची तीव्र धार यावेळी त्यांच्यात नव्हती. मतदान पार पडल्यानंतरही गटातटाने कार्यकर्त्यांनी आपापल्या कंपूत जाऊन आकडेवारीची जुळणी केली. यादरम्यान अरेरावीचा प्रकार घडला नाही. माजी आमदार भानुदास मुरकुटे, खा. सदाशिव लोखंडे, भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे, आ. लहू कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी निवडणुकीत थेट हस्तक्षेप टाळला. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये विखे-मुरकुटे-ससाणे-कानडे यांची छायाचित्रे एकाच मंडळाच्या पत्रकांवर होती. स्थानिक प्रश्नांवरच ही निवडणूक झाली.
.......
संघर्ष थंडावला
यापूर्वी तालुक्यातील बेलापूर, पढेगाव, कारेगाव, टाकळीभान, वडाळा महादेव येथे अनेकदा निवडणुकांमध्ये हाणामारीचे गंभीर प्रकार घडले. अनेक कार्यकर्त्यांना न्यायालयात खटल्यांना सामोरे जावे लागले. आता मात्र गावोगाव भाऊबंदकीचा संघर्ष थंडावला आहे. ही सकारात्मक बाब या निवडणुकीत पहायला मिळाली. त्यामुळे पोलीस प्रशासन व निवडणूक यंत्रणेचा ताण कमी झाला. यावेळी निवडणुकीत तालुक्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नव्हते. पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्याची गरज पडली नाही.
----------
कर्जमाफीचा लाभ
राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे सेवा संस्थांचे थकबाकीदार कर्जमुक्त झाले. नवीन कर्जाकरिता ते पात्र ठरले. त्यामुळे निवडणुकांमध्ये होणाऱ्या खर्चाकरिता उमेदवारांना पर्याय मिळाला. ऊस व अन्य नगदी पिकांवरील कर्ज उपलब्ध झाल्याने त्या पैशांचा वापर निवडणुकांमध्ये झाल्याचे दिसले.
------------