श्रीरामपुरात तरुणांकडे आला गावचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:21 AM2021-02-11T04:21:43+5:302021-02-11T04:21:43+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील मंगळवारी निवड झालेल्या प्रमुख ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदी काही तरुण व उमेदीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. ...
श्रीरामपूर : तालुक्यातील मंगळवारी निवड झालेल्या प्रमुख ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदी काही तरुण व उमेदीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. ग्रामीण भागातील काही दिग्गज व जुन्या नेत्यांना धक्का देत या तरुणांनी सत्तांतर घडविले. उच्च शिक्षित असलेल्या गावच्या या नव्या सूत्रधारांकडून जनतेला कामाच्या अपेक्षा आहेत.
लोकसंख्येने मोठ्या असलेल्या बेलापूर, टाकळीभान, पढेगाव, निपाणीवाडगाव, वडाळा महादेव, गोंडेगाव, गोवर्धनपूर या प्रमुख ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम मंगळवारी (दि.९) पार पडला. यात अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत जाएंट किलर ठरलेल्या तरुणांकडे ग्रामपंचायतीचा कारभार आला आहे.
बेलापूर येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पदवीधर असलेल्या महेंद्र साळवी तसेच एमबीएचे शिक्षण घेतलेले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. खंडागळे यांनी उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत दिवंगत नेते मुरलीधर खटोड यांचे चिरंजीव रवी यांचा ११ विरुद्ध ६ अशा फरकाने पराभव केला. ग्रामपंचायतीत जाणकारांचे अंदाज चुकवत सत्तांतर घडवून आणण्यात याच तरुणांनी भूमिका बजावली.
टाकळीभान येथे यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिलेल्या कान्हा खंडागळे यांना आता उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. खंडागळे यांचा दांडगा जनसंपर्क असून, अडचणीतील लोकांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर असतो. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची त्यांनी साथ केली आहे.
गोंडेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर होत सरपंच व उपसरपंचपदी दोघा तरुणांना संधी मिळाली आहे. सरपंच झालेल्या सागर बढे यांना उमेदीच्या काळात काम करण्याची संधी मिळाली आहे. वडाळा महादेव येथे दादासाहेब झिंज यांच्या रूपाने तरुण सरपंच लाभला आहे. ते मागील काळात सदस्य राहिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस
अविनाश आदिक यांचे ते समर्थक आहेत. बेलापूर खुर्द येथे दीपक बारहाते तर गोवर्धनपूर येथे राहुल जगताप यांना उपसरपंच पदावर काम करण्याची संधी मिळाली. बारहाते हे व्यवसायाने वकील आहेत.
वयाच्या तिशीत व चाळिशीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम करण्याची या तरुणांना संधी मिळाली आहे. कोरोना काळात मागे पडलेल्या कामांना त्यांना चालना देता येणार आहे. त्याकरिता १५ व्या वित्त आयोगाचा निधी खात्यांवर जमा झालेला आहे. गावपातळीवर कामाची छाप सोडत जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच सहकाराच्या राजकारणात त्यांना शिरकाव करण्याची संधी प्राप्त झाली आहे.