नगर शहरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:08+5:302021-04-11T04:21:08+5:30
किराणा, मेडिकल, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद होत्या. रस्त्यावरील रहदारीही अत्यल्प होती. लसीकरण केंद्र व ...
किराणा, मेडिकल, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद होत्या. रस्त्यावरील रहदारीही अत्यल्प होती. लसीकरण केंद्र व शिवभोजन केंद्रावर काही प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली. संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी शहरात चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून वीकेंड लॉकडॉऊनला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिल्याने नागरिकांनी घराबाहेर येण्याचे टाळले. रस्त्यावर तैनात असलेले पोलीस नजरेस पडणाऱ्या नागरिकांची चौकशी करीत होते. कामगार, सरकारी कर्मचारी तसेच ज्यांना हॉस्पिटलच्या संदर्भात काम आहे त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही. मात्र, जे विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसले त्यांना समज देत पोलिसांनी काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली. शहरातील कापड बाजार, नवी पेठ, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, माळीवाडा, सावेडी, बालिकाश्रम रोड, पाईपलाईन रोड, मुकुंदनगर, केडगाव आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच शनिवारी सकाळी पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी गस्त घालून नागरिकांना घराबाहेर न पडण्याबाबत सूचित केले होते.
................
बसस्थानकात प्रवासी विरळ
एसटी बस सेवा सुरू होती. मात्र, लॉकडाऊनमुळे नागरिकांनी प्रवास टाळल्याने बसस्थानकातही प्रवाशांची गर्दी शनिवारी दिसली नाही. बहुतांशी बस मोकळ्याच धावताना दिसल्या तर प्रवासी नसल्याने बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
............
अत्यावश्यक वस्तूंची आधीच खरेदी
शनिवार व रविवार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी असल्याचे प्रशासनाने आधीच जाहीर केले होते. त्यामुळे नागरिकांनीही एक दिवस आधीच किराणा, भाजीपाला व इतर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करून ठेवली होती. शुक्रवारी बाजारात भाजीपाला व किराणा खरेदीसाठी नागरिकांनी विविध ठिकाणी गर्दी केल्याचे दिसले.