Independence Day 2018 शूरा आम्ही वंदिले : अवतरला जणू अभिमन्यूच, शहीद भाऊसाहेब बडाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:15 PM2018-08-13T12:15:09+5:302018-08-14T08:00:00+5:30
मालुंजे (ता. श्रीरामपूर) येथील शहीद भाऊसाहेब विष्णुपंत बडाख याच्या वीरमाता इंदुबाई मुलाच्या आठवणी अजूनही डोळ्यांसमोर ताज्या असल्यागत सांगत होत्या.
‘लहानपणापासूनच नोकरी करेन तर लष्करातच, ही त्याची जिद्द होती. आजोबा स्वातंत्र्यसैैनिक, तर मामा हवाईदलाच्या सेवेत असल्याने तो जोश भाऊसाहेबाच्या अंगात भिनलेली होती. भरतीला जायचा. भरती नाही झाला तर, अंथरुणात तोंड खुपसून पडायचा; ढसाढसा रडायचा. तो खूप जिद्दी होता़ लष्करात भरती झाला़ एका चकमकीत त्याने उग्रवाद्यांशी दोन हात करुन त्यांचे चक्रव्यूह भेदले़ पण...’
मालुंजे (ता. श्रीरामपूर) येथील शहीद भाऊसाहेब विष्णुपंत बडाख याच्या वीरमाता इंदुबाई मुलाच्या आठवणी अजूनही डोळ्यांसमोर ताज्या असल्यागत सांगत होत्या. तब्बल १६ वर्षे झाली भाऊसाहेब यांना वीरमरण पत्करून. मात्र तरीही एका आईच्या मनातील दु:खाचे भाव तसूभरही कमी झालेले नव्हते. श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीकाठावरील बागायती परिसरातील मालुंजे हे गाव. एकत्रित व मोठ्या कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या भाऊसाहेब यांनी लष्करात भरती होण्याचा चंग बांधला होता. वडील विष्णुपंत मुरलीधर बडाख हे मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेत नोकरीस होते. आई इंदुबाई, मोठी बहीण सुरेखा, प्रवीण व स्वाती ही भावंडे. कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द हे त्यांचं आजोळ. आजोबा विठ्ठल सखाराम आभाळे हे स्वातंत्र्यसैैनिक होते. त्यांचं गावी स्मारक बांधण्यात आलं आहे. मामा रावसाहेब आजही हवाईदलात कार्यरत आहेत. हे दोघे भाऊसाहेब यांचं स्फूर्तिस्थान, प्रेरणास्थान. हरहुन्नरी मुलगा अशीच भाऊसाहेब यांची गावात ओळख. विटी-दांडू, कबड्डी, खो-खो हे त्यांचे आवडते खेळ. प्राथमिक शिक्षण मालुंजे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. पुढील शिक्षण ५ वी ते ७ वीपर्यंत गावातील केशव औटी विद्यालयात व दहावीपर्यंत श्रीरामपूरच्या करमशी जेठाभाई सोमय्या हायस्कूलमध्ये झालं. पुढे बारावीपर्यंत श्रीरामपूरच्या बोरावके महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलं. त्याच वेळी आई-वडिलांनी शेती अथवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा आग्रह धरला. शेतीच्या कामात वडिलांच्या खांद्याला खांदा देऊन काम भाऊसाहेब करीत. मात्र लष्करभरतीचा हट्ट काही केल्या कमी होत नव्हता.
राज्याच्या कानाकोपऱ्यात तो भरतीसाठी जायचा. त्यासाठी दीडशे-दोनशे रूपये देत असे. एखाद-दुसºया वेळी आम्ही दिले नाही, तर चुलते किंवा आत्या-मामांकडून घ्यायचा. अपयश आलं तर, घरी आल्यानंतर कुणाशीही न बोलता अंथरुणात तोंड खूपसून रडायचा. पुन्हा जोमाने मेहनत करायचा,’ आई इंदुबार्इंनी आठवणी ताज्या केल्या. ‘आई-वडिलांपेक्षाही चुलत्यांमध्ये तो जास्त रमायचा. त्याचा मित्रपरिवार मोठा होता. कुणाच्याही मदतीला धावून जाणं हा त्याचा स्वभाव. अखेर १६ आॅक्टोबर १९९८ मध्ये तो दिवस उजाडला. सैैन्यात भरती होण्याचे भाऊसाहेबचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. पुण्यात तो भरती झाला. बेळगाव (कर्नाटक) येथे मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये दोन वर्षांचं खडतर प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर गुजरात, राजस्थान या ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सेवा बजावली. मल्लखांब हा भाऊसाहेबचा आवडता खेळ. पायाच्या अंगठ्याच्या बळावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळत कसरती करण्यात तो वाक्बगार होता. असेच एका प्रात्यक्षिकादरम्यान त्याचा अपघात घडला. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात भरती व्हावं लागलं. त्यानंतर पुन्हा सैन्यात रुजू झाला़’
वडील विष्णुपंत आजारी असल्याचे कळाल्याने १६ जून २००२ मध्ये भाऊसाहेब घरी आल्यानंतर मोठा मित्रपरिवार जमला. वडिलांवर औषधोपचार झाल्यानंतर २० जुलैैस पुन्हा हजर झाले. देशसेवेबरोबरच घरच्या जबाबदारीप्रती भाऊसाहेब सजग होते. एकत्रित कुटुंबात वाढल्याने त्यांच्यात मायेचा ओलावा निर्माण झालेला होता.
आसाममधील न्यू बोगाईगाव येथे भाऊसाहेब कार्यरत होते. उग्रवादाने प्रभावित असलेला हा परिसर. १ आॅगस्टला प्रत्यक्ष कामाचा चार्ज घ्यायचा होता. हा भाग नदी-नाले व जंगलाने वेढलेला होता. परिसरात सुरक्षा पाहणी करणारा एक सहकारी आजारी असल्याने भाऊसाहेब यांनी बदली सैैनिक म्हणून जबाबदारी स्वीकारली. २९ जुलैैचा तो दिवस होता. एका तुकडीनिशी ते जंगलातून जात होते. सकाळी ८ वाजेची वेळ. या दरम्यान त्यांना नदी ओलांडायची होती. एक गुप्त खबरी, दोन जवान व एका तुकडीप्रमुखासह भाऊसाहेब यांनी छोट्या नावेतून नदी ओलांडली. त्यावेळी तुकडीतील तितकेच सदस्य मागे राहिले होते. नदीच्या दुस-या बाजूला गवताळ प्रदेश व त्यापुढे घनदाट जंगल होते. डोक्याहून वाढलेल्या गवतातून अचानक बेछूट गोळीबार सुरू झाला. अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वांनाच धक्का बसला. ५० ते ६० उग्रवाद्यांनी आपल्याला तीनही बाजूंनी वेढल्याचे तुकडी प्रमुखांच्या लक्षात आले. या दरम्यान गोळीबारात खब-या मृत्युमुखी पडला. मी एकटा मुकाबला करणार आहे; इतरांनी काय तो निर्णय घ्या, असे तुकडी प्रमुखांनी सुनावले.
मागे फिरणार तो भाऊसाहेब कसला! सर्व जण एकवटले. दोन्ही बाजूंनी फायरिंग सुरू झाली. मात्र सर्व बाजूंनी गोळ्यांचा मारा झाल्याने तुकडीतील सर्व पाच सैैनिक शहीद झाले. कुणीही मागे हटले नाही. भाऊसाहेब यांनी सहका-यांसह वीरमरण पत्करले. भारतीय सैैन्याने एक लढवय्या सैनिक गमावला होता. दुस-या दिवशी म्हणजेच ३० जुलैै रोजी घरी मालुंज्यात फोन खणखणला. एका नातेवाइकाने तो स्वीकारला. मात्र आई किंवा वडिलांशी बोलायचं आहे, असं पलीकडून उत्तर मिळालं. वडील विष्णुपंत यांना भारतीय लष्कराच्या वतीने घटनेची माहिती देण्यात आली. बडाख कुटुंबीयांच्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं.
घटनेच्या दुस-या दिवशी शहीद भाऊसाहेब यांचं पार्थिव विमानाने आसाममधून पुणे येथे आणण्यात आलं. तोपर्यंत घटनेची वार्ता अहमदनगर जिल्ह्यात पसरली होती. हजारो लोक शहिदाला अखेरची मानवंदना देण्यासाठी जमले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील मित्रपरिवाराने आपला सखा गमावला होता. बडाख कुटुंबीयांवर हा मोठा आघात होता.
संघर्षातून मिळविला पेट्रोलपंप
मुलाचे नाव अजरामर रहावे, अशी वडील विष्णुपंत यांची मनोमन इच्छा होती. यासाठी त्याच्या नावाने पेट्रोल पंप सुरू करण्याची त्यांनी जिद्द बाळगली. सन २००३-०४ चा हा काळ. पेट्रोलियम कंपनीने शहीद सैैनिकांकरिता शिक्षणाची १५ गुणांची अट शिथिल करावी, अशी मागणी बडाख यांनी केली. याकरिता त्यांनी सरकार दरबारी मोठी लढाई लढून ती जिंकलीही. मात्र एवढ्यावरच संघर्ष थांबणार नव्हता. देहरे (ता. नगर) येथे त्यांनी पेट्रोल पंप मिळविला. मात्र त्यास शहीद भाऊसाहेब बडाख हे नाव देण्यासाठी दुसरा संघर्ष करावा लागला. तत्पूर्वी हा पंप दुस-या एका फर्मने नोंदणीकृत केला होता. नावात बदल करता येणार नाही, असे पेट्रोल कंपनीकडून सांगण्यात आले. त्याविरोधात विष्णुपंत यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. तेथे काही सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर कंपनीने तडजोडीसाठी तयारी दर्शविली. अखेर पंपाला शहीद जवान भाऊसाहेब बडाख असे नाव मिळाले. हा पंप व मालुंजातील शेतीवरच या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू आहे. वडील विष्णुपंत व भाऊ प्रवीण हे दोघं नगर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील देहरे टोलनाक्याजवळील पेट्रोलपंपाचा व्यवहार सांभाळतात.
मालुंजेत स्मारक
मालुंजे गावात शहीद भाऊसाहेब बडाख यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. गावातील पुढच्या पिढीला देशसेवेची प्रेरणा यातून मिळत आहे. गावातील व परिसरातील अनेक तरूण त्यानंतर लष्करात दाखल झाले आहेत. या स्मारकाने त्यांच्यात देशप्रेमाची ठिणगी पेटविण्याचे काम केले आहे. जिल्ह्यातील देशप्रेमी नागरिक या स्मारकास वर्षभर भेट देतात. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भेट देणाºयांची संख्या मोठी असते.
शिपाई भाऊसाहेब बडाख
जन्मतारीख २४ जून १९८१
सैन्यभरती १६ आॅक्टोबर १९९८
वीरगती २९ जुलै २००२
सैन्यसेवा ११ महिने १३ दिवस
वीरमाता इंदुबाई बडाख
शब्दांकन : शिवाजी पवार