शूरा आम्ही वंदिले : लढाऊ अण्णा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:50 PM2018-08-22T12:50:18+5:302018-08-22T12:56:19+5:30
‘आपल्या मातृभूमिच्या रक्षणासाठी युवकांनो तुमची गरज आहे. भारतमाता तुम्हास साद घालत आहे’, अशा शब्दात भारत सरकारकडून युवकांना सेनादलात भरती होण्यासाठी आवाहन केले जात होत होते़
‘आपल्या मातृभूमिच्या रक्षणासाठी युवकांनो तुमची गरज आहे. भारतमाता तुम्हास साद घालत आहे’, अशा शब्दात भारत सरकारकडून युवकांना सेनादलात भरती होण्यासाठी आवाहन केले जात होत होते़ या आवाहनाला प्रतिसाद देत एक कमी उंचीचा, कमकुवत शारीरिक बांधा असलेला तरुण सैन्य भरतीच्या रांगेत उभा राहिला़ सैन्यात भरती झाला आणि एक तप सेवादेखील केली़ सेना दलात असताना कर्नलविरोधात थेट लेफ्टनंट जनरलकडे तक्रार करण्याची हिम्मत दाखवणारे हे जवान म्हणजेच किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णासाहेब हजारे़ सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी देशासाठी सामाजिक लढाई हाती घेतली.
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. त्या युद्धात भारताची मोठी हानी झाली. मोठ्या संख्येने भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. सेना दलात युवकांची भरती सुरू झाली.
मातृभूमिच्या सेवेसाठी धावून गेले पाहिजे. या विचाराने भारावून अण्णांनी भरतीसाठी अर्ज केला आणि लष्करात निवड झाली. सुरुवातीला दोन महिने मुंबईला बॉम्बे मोटर ड्रायव्हींगमध्ये ट्रक आणि इतर गाड्या चालविण्याचे तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले. आरटीओची ड्रायव्हिंग परीक्षा पास झाले. नंतर त्यांच्या बॅचला बेसिक प्रशिक्षणासाठी औरंगाबादला पाठवण्यात आले. तेथे अवजड वाहने चालविण्याबरोबरच गाड्यांच्या इंजिन व इतर सर्व स्पेअरपार्टची माहिती देण्यात आली. नादुरुस्त गाड्या दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सेना दलात प्रत्येक ड्रायव्हर हा स्वत: प्रशिक्षित फिटर असतो. तसाच प्रशिक्षित सैनिकही असतो. तसे प्रशिक्षण तिथे होते. बंदूक स्टेनगन व लाइट मशीनगन चालविण्याचे प्रशिक्षण अण्णांनी घेतले. रोज परेड व पीटी होतीच. वर्षभरही सर्व प्रशिक्षण झाल्यावर आर्मी सप्लाय कोर (ए.एस.सी.एम.टी.) रेजिमेंटसाठी निवड झाली. शेवटची पासआऊट परेड झाल्यावर कंपनी दिल्लीकडे रवाना झाली. तो दिवस १ जानेवारी १९६४ होता. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीचा अण्णांनी प्रथमच अनुभव घेतला.
नवीन लष्करी ट्रक हवाली करण्यात आले. त्या गाड्या घेऊन ते पंजाबात अंबाला कॅम्पला गेले. अंबालात कालका, नहान, सिमला, रामपूर, टापरी, शुगर सेक्टर अशा पहाडी भागात अवजड ट्रक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. अंबाला कालकामार्गे सिमला, रामपूर, टापरी, शुगर सेक्टर अशा अवघड नागमोडी वळणाच्या घाटावरून गाडी चालविण्याचे कौशल्य अण्णांनी संपादन केले. त्यावेळी आण्णांचे वय होते २५ वर्षांचे!
मातृभूमीच्या रक्षणाखाली सेनादलात अण्णांनी एक तप सेवा केली. या सेवेत जीवावरील अनेक प्रसंग आणि अनुभव आले. त्यातून अण्णांना खूप काही शिकायला आणि पहायला मिळाले. १९६५ भारत - पाकिस्तान युद्ध सुरू झाले. लाहोर सेक्टरमधील खेमकरण भागात घमासान युद्ध चालू होते. समोरासमोर लढाई चालू होती प्रतिस्पर्ध्यांचे क्षेत्र काबीज करून रस्ते, पूल, इंधन व अन्नधान्यसाठे उद्ध्वस्त करण्याची रणनीती दोन्ही सैन्यांकडून आखली जात होती. भारतीय सैन्याला पेट्रोलजन्य इंधन व धान्यसाठा रसद पुरवण्याची जबाबदारी ज्या कंपनीकडे होती, त्यात अण्णा काम करीत होते. रसद भरलेल्या लष्करी वाहनांचा ताफा खेमकरण सीमेकडे आगेकूच करत होता. ताफ्याच्या सर्वात पुढे अण्णांचा ट्रक होता. मैदानी भागातून संथपणे एकसाथ पुढे वाटचाल करीत असतानाच आकाशात पाकिस्तानची दोन सेबरजेट विमाने अवतीर्ण झाली. त्यांनी एअरफायर खोलून हल्ला केला. एकदा हल्ला झाल्यावर पुन्हा पाकिस्तानी विमाने फिरून आली. दुसऱ्यांदा त्यांनी हल्ला केला. गोळ्यांचा मारा चुकवण्यासाठी सगळेच स्टेअरिंग खाली बसले. गाडी रस्त्याच्या कडेला एका विजेच्या खांबाला धडकून थांबली. ट्रकच्या कॅबिनमधून पटकन खाली उडी मारून अण्णा जमिनीवर पडून राहिले. पाकिस्तानी विमाने निघून गेली होती. मागच्या गाडीतील अधिकांश जवान देवाघरी गेले होते. अण्णांच्या गाडीत २५ - ३० गोळ्या घुसल्या होत्या. सुदैवाने इंजिन व पेट्रोलची टाकी सुरक्षित होती. मात्र गाडीचे पुढचे टायर गोळ्या घुसून निकामी झाले होते. पुढच्या काचेतून गोळ्या आत आल्या होत्या. खाली वाकल्याने अण्णांच्या कपाळाला गोळीने छोटीशी जखम झाली होती. परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या साथीदारांचे हात आणि पाय जायबंदी म्हणजे जवळजवळ तुटले होते.
सारं दृश्य अतिशय हृदयद्रावक होते. हृदयात दु:ख आणि वेदनांचा वणवा पसरला होता. ताफ्यातील मागचे पुढचे जवान देशसेवा करता करता धारातीर्थी पडले होते. त्यांना सहीसलामत जीवदान मिळाले होते. हे मिळालेले जीवन म्हणजे पुनर्जन्म आहे. आता समाजासाठीच जीवन समर्पित करायचे आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसार समाजाची निष्काम सेवा अखेरच्या श्वासापर्यंत करायची, असा निश्चय त्यावेळी अण्णांनी केला. विवाह करायचा नाही. अविवाहित राहून देश सेवा करायची अशी भीष्मप्रतिज्ञा अण्णांनी केली. तो दिवस होता ११ डिसेंबर १९६५.
सेना दलातील बारा वर्षांच्या सेवेत शिस्त आणि नियमांचे उल्लंघन त्यांनी कधीच केले नाही. मात्र अन्याय आणि असत्य सहन केला नाही. सत्याची कास धरून जवानांवर होणाºया अन्यायाविरुद्ध सातत्याने लढा दिला. तो लढा सत्याच्या जोरावर यशस्वी केला. कंपनी असो अगर बटालियन असो दर दोन महिन्यांनी सेनादलात सर्व जवानांसह दरबार भरविला जातो. या दरबाराला बडे बडे लष्करी अधिकारी उपस्थित असतात. आपआपल्या कंपनीतील अडीअडचणी दरबारात मांडावयास अधिकारी जवानांना सांगतात. या दरबारात अधिकाºयांपुढे बोलायचे धाडस जवान सहसा करत नाहीत. ते धाडस अण्णा सतत करीत राहिले. वैयक्तिक अडचणी दरबारात त्यांनी कधीच मांडल्या नाहीत. जवानांच्या हिताच्या सामुदायिक अडचणी त्यांनी मांडल्या. जवानांच्या मेसमध्ये सडलेली फळे, भाजीपाला यायचा. पुरवठादाराला मात्र भाव चांगल्या मालाचा दिला जायचा असे का? हा एक प्रश्न दरबारात त्यांनी मांडला. त्या अधिकाºयाचे व भाजीपाला पुरवठादाराचे साटेलोटे असल्याने तो अधिकारी खूप चिडला. त्याने अण्णांचा अपमान केला. कोर्ट मार्शल करण्याची भाषा वापरली. ते त्यांना सहन झाले नाही. तीन सिंह आणि त्याखाली लिहिलेले ‘सत्यमेव जयते’हे देशाचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. सत्य तेच बोललो त्यात आपणास राग येण्याचे कारण नाही. उलट सत्याचे स्वागत केले पाहिजे. असे सडेतोड उत्तर त्यावेळी अण्णांनी दिले. वेळ प्रसंगी जवानांना लढायचे असते. त्यासाठी तो सदैव धडधाकट व अरोग्य संपन्न हवा. सडका भाजीपाला खाऊन उद्या जवान आजारी झाले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न अण्णांनी केला. या प्रश्नाने तो अधिकारी आणखीनच लालबुंद झाला. ‘सत्य मान्य नसेल तर सेनादलात राहायचे नाही. पोटाची नोकरी म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून सैनिकाचा पेशा स्वीकारला आहे’. असे म्हणत अण्णांनी मिलिटरी गणवेश अंगावरून उतरविला. त्यावेळी इतर अधिकाºयांनी सांगितले की, या खतरनाक जवानाच्या नादी लागू नका. जीव गेला तरी तो सत्य सोडणार नाही. त्यामुळे तो अधिकारी गप्प झाला. एकदा जवानांच्यावरील रजेचा अन्याय दूर करण्यासाठी अधिकाºयांविरोधात लढा द्यावा लागला. कर्नलच्या हटवादीपणाविरुद्ध लेफ्टनंट जनरलकडे तक्रार करण्याचे धाडस केले. त्यांनी अण्णांची कैफियत मान्य केली. त्याने बटालियनमधील सर्व जवानांचा फायदा झाला.
अरुणचलचा बरचसा भाग आता चीनने गिळंकृत केला आहे. पश्चिम बंगालमधील सिलिगुडी, सिक्कीमच्यापुढील चीन सीमेवरचा प्रदेश, मिझोराम, नागालँड या दुर्गम व प्रतिकूल वातावरणात असलेल्या प्रदेशात पाच वर्षे अण्णांनी काम केले. नंतर काश्मीर खोºयातील लेह लडाख क्षेत्रात काम केले. तेथील हिमप्रदेश त्यातून उगम पावणाºया पवित्र नद्या आणि वन्यजीव पाहून तनमन मोहरून जायचे. बारा वर्षांच्या सेवाकाळात अण्णा पाच वर्षे हिमालयाच्या सहवासात होते. हिमालयाने त्यांना अनेक वेळा मृत्यूचे दर्शन घडवले. मिझोराम राज्यात ट्रक चालले असताना गाड्या उडवण्यासाठी सापळा लावला होता. अण्णा स्वत: चालवत असलेल्या ट्रकवर तर थेट गोळीबार झाला. त्यातून अण्णा सहीसलामत वाचले. काश्मीर खोºयात ट्रक चालवणे म्हणजे मृत्यूशी सामना करण्यासारखे आहे. हिवाळ्याच्या दिवसांत रस्ता बफार्खाली झाकला जातो. त्यावरून ट्रक चालवित असताना घसरून उलटा झाला; पण खरचटण्यापलीकडे दुखापत झाली नाही. एकदा अण्णांसह दोघे जवान आयझलवरून ब्रह्मदेशाच्या लुंगताई सीमाभागात चालले होते. मार्गात डोंगरातून वाहणारा एक शुभ्र पाण्याचा झरा लागला. साथीदार त्या झºयावर अंघोळीसाठी थांबला. अण्णा पुढे निघाले. त्याचवेळी साथीदाराला त्याच्या हत्यारासाहित अतिरेक्यांनी पळवून नेले. पुढे गेल्याने अतिरेक्याच्या तावडीतून अण्णा वाचले. मृत्यू घिरट्या घालत असताना प्रत्येक वेळी परमेश्वराने वाचविले, अशी अण्णांची भावना आहे. त्यामागे परमेश्वराचा काय हेतू होता ते समजले नाही. मात्र त्याचा देशाला उलगडा झाला आहे.बारा वर्षांची सेवा झाल्यावर सेनादलातून निवृत्त होऊन अण्णा निवृत्तीवेतनास पात्र झाले. ते एवढ्यासाठीच की, समाजसेवा करीत असताना त्यांचा भार इतरांवर पडू नये अशी इच्छा होती. अशा प्रकारे १९७५ साली सेनादलातून निवृत्त होऊन राळेगणसिद्धीला आलो आणि ‘जय जवान’कडून जय किसान’ चा मार्ग स्वीकारला.
- शब्दांकन : एकनाथ भालेकर