शूरा आम्ही वंदिले : हिमालयी योद्धा, मिनीनाथ गिरमकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:37 AM2018-08-19T11:37:58+5:302018-08-19T11:40:11+5:30
घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. सहा महिन्यांचे असताना पितृछत्र हरपले. लहानपणी गोळ्या बिस्कीट विकून बारावीपर्यंत शिक्षण घेतले.
घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. सहा महिन्यांचे असताना पितृछत्र हरपले. लहानपणी गोळ्या बिस्कीट विकून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. एकुलता एक मुलगा असल्याने गावातच एखादी टपरी टाकून पोट भरावे, असे आईला वाटायचे. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या काठच्या अजनुज गावातील मिनीनाथ रघुनाथ गिरमकर यांनी देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होणे पसंत केले़ कारगील युद्धात आॅपरेशन रक्षकमध्ये अतिरेक्यांशी कडवी झुंज दिली.
अजनुज हे भीमा नदी काठावरील उसाचे आगार. वाळू उपशातून बनलेले धनिकांचे गाव. वळणेश्वर महाराजांची पावनभूमी. या भूमीत रघुनाथ व नर्मदाबाई यांच्या पोटी ६ डिसेंबर १९७४ रोजी मिनीनाथ यांचा जन्म झाला. मिनानाथ अवघे सहा महिन्याचे असताना पितृछत्र हरपले. ना जमीन, ना आर्थिक परिस्थिती चांगली़ प्रतिकूल परिस्थितीत नर्मदाबाई यांनी दीड रुपया रोजाने काम करून मिनानाथ यांना लहानाचे मोठे करण्यासाठी लढाई लढली. मिनीनाथ यांनी लहानपणापासून गरीबीचे चटके सोसले. आईच्या लढाईकडे पाहून आईला मदत करण्यासाठी मिनीनाथ धडपड करत असे.
मिनानाथ आठवीत असताना त्यांच्या मावशीने खाऊ घेण्यासाठी २५ रुपये दिले. पण मिनानाथ यांनी या पैशातून स्वत:साठी खाऊ न घेता २५ रुपयांचे दोन गोळ्यांचे पुडे आणले. या गोळ्या विक्रीतून दुप्पट पैसे जमले. गोळ््या विक्रीतून पैसे दुप्पट झाल्याने मिनीनाथ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याच पैशातून आईला मराठी शाळेजवळ गोळ्या-बिस्कीट विक्रीचा व्यवसाय सुरू करुन दिला. आईच्या हातातील खुरपे काढून घेतले. गोळ्या, बिस्किटे अन् पेरू विकून स्वत:चे शिक्षण केले. माध्यमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी श्रीगोंदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. अजनुज ते श्रीगोंदा असा बसने दररोज प्रवास करावा लागणार होता. मात्र बसचा पास काढण्यासाठी पैसे नसायचे, मात्र चिकाटीने त्यांनी शिक्षण घेतले़ बारावीत असताना १२ फेब्रुवारी १९९६ रोजी मिनीनाथ सैन्यदलात भरती झाले. जबलपूर (मध्यप्रदेश) येथे नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वी पार पाडल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग नोव्हेंबर १९९६ जोधपूर (राजस्थान) रोजी झाली़
मिनानाथ सुट्टीला अजनुजमध्ये आले की सर्वांच्या भेटी घेत असत. विचारपूस करीत असत. असेच एकदा सुट्टीवर असताना शेजारील विठ्ठल घाडगे व पांडुरंग घाडगे यांचे छप्पर पेटले. मिनीनाथ यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जाळात उडी मारुन घाडगे यांचे संसारोपयोगी साहित्य बाहेर काढले होते, अशा मिनानाथ यांच्या सामाजिक व धाडसी आठवणी त्यांचे मित्र सांगतात़
जोधपूर येथून मिनानाथ यांची १९९९ मध्ये जम्मू काश्मीर राज्यातील रामबन येथे बदली झाली़ त्याचवेळी कारगील युद्धाला तोंड फुटले होते़ कारगिल युद्धात मिनानाथ गिरमकर यांनी पाकिस्तानी सैनिकाविरोधात जोरदार लढा दिला़ पाकिस्तानने आपले सैन्य माघारी घेतले़ त्यानंतरही सीमेवर छोट्या-मोठ्या चकमकी झडत होत्या़
रामबन हा भाग पाकिस्तानी सीमेलगत आणि हिमालय पर्वत रांगेत वसलेला आहे़ त्यामुळे या भागात अतिरेक्यांना प्रवेश करण्यास सोपे जाते़ २००१ मध्ये पाकिस्तानी हद्दीतून भारतीय सीमा ओलांडून अतिरेक्यांचा एक मोठा गट सीमाबन भागात घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली़ या घुसखोरांपासून भारतीय सीमांचे आणि स्थानिकांचे रक्षण करण्यासाठी सैन्याकडून आॅपरेशन रक्षक मोहीम हाती घेण्यात आली़ तो रविवारचा (१८ नोव्हेंबर २००१) दिवस होता़ रामबनच्या दिशेने घुसखोरांचा एक लोंढा येत असल्याची माहिती लष्कराला मिळाली़ हिमालयाच्या पीर पांजल डोंगररांगेत लष्कर व घुसखोरांमध्ये धुमश्चक्री झाली़ घुसखोर उंच डोंगरावरुन भारतीय जवानांवर गोळीबार करीत होते़ वरच्या दिशेने गोळीबार करणे, सैन्याला कठीण जात होते़ तरीही हिमालयाचे जिगर घेऊन मिनानाथ या घुसखोरांवर तुटून पडले होते़ आपल्या बंदुकीत मिनानाथ यांनी अत्यंत वेगवान मारा घुसखोरांच्या दिशेने सुरु केला़ त्यामुळे काही वेळ थांबून घुसखोरांनी मिनिनाथ यांना टार्गेट करुन पहाडावरुन त्यांच्यावरच निशाणा साधला़ घुसखोरांच्या बंदुकीतून निघालेल्या एका गोळीने मिनानाथ यांचा वेध घेतला़ ही गोळी त्यांच्या थेट डोक्यातच घुसली अन् ते रक्ताच्या थारोळ्यात पडले़
१९ नोव्हेंबर २००१ रोजी नर्मदाबाई यांना लष्करी अधिकाऱ्यांचा फोन आला. ते हिंदीतून सांगत होते़ पण नर्मदाबाई यांना काही समजले नाही़ २५ नोव्हेंबर रोजी तब्बल सातव्या दिवशी मिनानाथ यांचे पार्थिव गावात आले. मिनिनाथ यांचे पार्थिव पाहताक्षणी नर्मदाबाई बेशुद्ध पडल्या. शोकाकुल वातावरणात ‘जय जवान जय किसान’, ‘मिनानाथ गिरमकर अमर रहे!’ अशा घोषणा देत लष्करी इतमामात वीरपुत्र मिनानाथ यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र, अनेक दिवसांच्या उपचारानंतर नर्मदाबाई शुद्धीवर आल्या़ आजही त्यांना मुलाची आठवण आली की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते, एव्हढा गंभीर आघात नर्मदाबार्इंवर झाला़
घराला तिरंग्याचा रंग
अजनुज गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या घरात नर्मदाबाई राहतात़ शहीद मुलाची आठवण म्हणून या वीरमातेनं तिरंग्याचा रंग घराला दिला आहे. शहीद मिनानाथ यांची आठवण अन् प्रेरणा म्हणून गावकरी व वीरमातेने शाळा परिसरात शहीद स्मारक बांधले आहे. वीरमाता नर्मदाबाई दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवतात. गावातील वळणेश्वर माध्यमिक विद्यालयास सांस्कृतिक मंच त्यांनी बांधून दिला आहे.
आठवण आली की दवाखाना
मी एकुलत्या एक मुलासाठी कपाळावर सौभाग्याचे कुंकू नसताना संघर्ष केला. वारसा हक्काची गुंठाभरही जमीन मिळाली नाही. माझं लेकरू शहीद झाल्याची बातमी समजल्यानंतर मी बेशुद्ध पडले. चार वर्षे माझी विस्मरणात गेली. आताही त्याची आठवण आली की बीपी वाढतो. दवाखान्यात जाण्याची वेळ येते. साहेब मला नका विचारू. गावाला विचारा मिनानाथ कसा होता. सध्या मी आजारी असून तीन वर्षापासून मला विलास नाना गिरमकर यांच्या घरून डबा येतो. तो डबा खात एकएक दिवस मी ढकलत आहे. गावातील लोकच माझा आधार आहेत, असे वीरमाता नर्मदाबाई सांगतात.
लग्नासाठी यायचे होते...आले पार्थिव
मिनानाथ यांचे लग्नाचे वय झाल्याने त्यांच्या आईने एक मुलगी पाहिली. मुला-मुलीचे एकमेकांना पाहणे झाली़ मुलगी पसंत असल्यामुळे मिनानाथ यांनी लग्नास होकार दिला. आईने लग्नाची तारीखही काढली होती. २१ नोव्हेंबर रोजी ते लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी काढून येणार होते़ पण १८ नाव्हेंबर रोजीच घुसखोरांच्या गोळी मिनानाथ यांचा घात केला अन् थेट मिनानाथ यांचे पार्थिवच अजनुज गावात आले़ ते पाहून वीरमाता नर्मदाबाई बेशुद्ध पडल्या़ चार वर्षे त्यांच्यावर उपचारच सुरु होते़
मी आठवीत होतो़ मला पुस्तके, वह्या नव्हत्या. मिनानाथ दहावीला होते. त्यांनी माझी परिस्थिती पाहिली. गोळ्या, बिस्कीट विकून मिळालेल्या पैशातून त्यांनी मला वह्या, पेन, पुस्तके घरी आणून दिली. ते जरी परिस्थितीने गरीब होते, तरी मनाने खूप श्रीमंत होते़ दानशूर होते- -विजय गिरमकर, मिनानाथ यांचे चुलतबंधू
- शब्दांकन : बाळासाहेब काकडे