अवैध धंदे बंद करा अन्यथा आम्ही करू; दहिगाव बोलका ग्राम सभेत महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 06:15 PM2023-10-04T18:15:17+5:302023-10-04T18:16:03+5:30
मोठ्या प्रमाणात गोसावी म्हशीवाले या समाजा बरोबर इतरही समाजाची वस्ती आहे.
सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (अहमदनगर ) : तालुक्यातील दहिगाव बोलका येथील शिवाजीनगर भागातील अवैध धंदे तातडीने बंद करा नाहीतर आम्ही महिला रणरागिणी बनून धंदे बंद करू, असा इशारा महिलांनी येथे आयोजित ग्राम सभेत दिला आहे. दहिगाव पासून उत्तरेस दिड किलोमीटर अंतरावर शिवाजीनगर हा गावाचाच उपविभाग आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोसावी म्हशीवाले या समाजा बरोबर इतरही समाजाची वस्ती आहे. याच परीसरात रविवारी सायंकाळी सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ. गुलाबराव वरकड यांच्यावर चाकुहल्ला झाला होता. सुदैवाने त्यातून ते बचावले परंतू त्यामुळे या परीसरातील अवैध धंद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चाकुहल्ल्याने संतप्त झालेल्या शिवाजीनगर व दहिगावातील ग्रामस्थांनी या विषयावर सभा घेण्याची मागणी केली होती परंतू सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक राज आहे त्यातच आज (बुधवार) पासून आचारसंहिता लागू होत असल्याने ग्रामस्थांनी शिवाजीनगर येथील सांस्कृतिक सभागृहात ग्रामस्थ सभा घेतली या सभेस महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. उपस्थित महिलांमधील ताराबाई राजेंद्र दुट्टे, कमळा सुरेश सावंत या व इतर महिलांनी परीसरातील दारू, मटका व जुगार हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. या अवैध धंद्यामुळे शिवाजीनगर परीसरात दहशत निर्माण झाली आहे. हे अवैध धंदे बंद झाल्यास परीसरात शांतता निर्माण होईल. येथून पुढे हे धंदे बंद न झाल्यास महिलाच हे धंदे बंद करतील असा इशारा महिलांनी दिला आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा संपता संपता पोलिसांनी या ठिकाणी भेट देऊन प्रश्न समजावून घेतले.