सिग्नल बंद, वाहनांची कोंडी, वाहतूक कर्मचारी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:40+5:302021-08-25T04:26:40+5:30
शहरातील नगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या चौकात सध्या पाईपलाईनच्या कामामुळे बालिकाश्रम रस्त्याच्या दिशेने एका बाजूने ...
शहरातील नगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या चौकात सध्या पाईपलाईनच्या कामामुळे बालिकाश्रम रस्त्याच्या दिशेने एका बाजूने रस्ता बंद करण्यात आला आहे. त्याच बाजूने हॉटेल असल्याने तेथील वाहनांची पार्किंग रस्त्यावरच असते. या चौकातील सिग्नल सध्या बंद आहे. वाहनांना दिशा दाखविण्यासाठी याठिकाणी एकाही कर्मचाऱ्याची नियुक्ती नाही. त्यामुळे नियमांचे ऐशीतैशी करत वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने चालवितात. त्यामुळे या चौकात वारंवार वाहतूककोंडी होत आहे. एकदा कोंडी झाली की, ती किमान पंधरा ते वीस मिनिटे मोकळी होती नाही. त्यामुळे पाठीमागे झोपडी कॅन्टीन ते पुढे स्टेट बँकेपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. मंगळवारी दिवसभरात वारंवार हे चित्र पहावयास मिळत होते. अशाही परिस्थितीत एकही वाहतूक कर्मचारी इकडे न फिरकल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
---------------------
कार सजावट रस्त्यावरच
नगर-मनमाड रोडवरील ओबेरॉय हॉटेल ते सावेडी नाक्यापर्यंत कार सजावटीचे मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. हे दुकानदार रस्त्यावरच कार उभा करून सजावट करतात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. एका दुकानासमोर एकाचवेळी चार ते पाच कार उभा केलेल्या असतात. वाहतूक विभागाचे याकडेही दुर्लक्ष होत आहे.
---------------------
वाहतूक शाखा सुस्त
नगर-मनमाड महामार्गावर दिवसभर आणि रात्री बारापर्यंत वाहतुकीची मोठी वर्दळ असते. या मार्गावरील काशिद हाॅस्पिटल श्रद्धा हॉटेल, झोपडी कॅन्टीने, माऊली संकुल ते थेट प्रेमदान चौकापर्यंत दोन्ही बाजूने दुकानासमोर अस्ताव्यस्त वाहने उभा केलेली दिसतात. वाहतूक शाखा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत असून काहीच कारवाई होताना दिसत नाही.
फोटो २४- वाहतूक १,२,३