निर्भयाच्या मारेक-यांना फाशी होईपर्यंत मौन सुरुच राहणार-अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:03 PM2020-01-08T13:03:59+5:302020-01-08T13:04:58+5:30
दिल्ली येथील निर्भयाच्या मारेक-यांना सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारी रोजी फाशी देण्याबाबत आदेश दिला आहे़. या आदेशामुळे न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक बळकट होईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़. मात्र निर्भयाच्या मारेक-यांना फाशी होईपर्यंत मौन सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले़.
पारनेर : दिल्ली येथील निर्भयाच्या मारेक-यांना सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारी रोजी फाशी देण्याबाबत आदेश दिला आहे़. या आदेशामुळे न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक बळकट होईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़. मात्र निर्भयाच्या मारेक-यांना फाशी होईपर्यंत मौन सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले़.
निर्भयाच्या मारेक-यांना फाशी होईपर्यंत हजारे यांनी मौन आंदोलन सुरु केले आहे़ न्यायालयाने निर्भयाच्या मारेक-यांना फाशीची तारीख निश्चित केली़ त्यानंतर हजारे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले़ यावर हजारे यांनी लिखित प्रतिक्रिया व्यक्त केली आहे़ ते म्हणाले, आमच्या देशाचे संविधान सर्वोच्च आहे. संविधानाच्या आधारे कायदे होतात व कायद्याच्या आधारे देश चालतो. निर्भया प्रकरणात न्यायालयाने २०१३ मध्ये आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु त्यानंतर ७ वर्षांचा प्रदीर्घ काळ गेला तरीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे देशातील जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाला होता. आज न्यायालयाने गुन्हेगारांच्या फाशीचे वॉरंट जारी करून २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशीची वेळ निश्चित केली आहे. त्यामुळे जनतेच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण होईल. न्याय व्यवस्थेत ‘देर है लेकिन अंधेर नहीं’ हा चांगला संदेश जाईल. गुन्हेगारांना फाशी झाल्याने महिलांवर अन्याय, अत्याचार करणा-या प्रवृत्तीला धाक निर्माण होईल. देशात अनेक पीडित निर्भया आहेत. त्यांनाही लवकरच न्याय मिळेल, असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला.