राजकारणातील साधा माणूस- दादा पाटील शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:42 PM2019-11-24T13:42:55+5:302019-11-24T13:43:51+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे शुक्रवारी (दि. २२) रात्री निधन झाले. राजकारणात राहुनही साधेपणा जपणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत!

Simple guy in politics - Dada Patil shelves | राजकारणातील साधा माणूस- दादा पाटील शेळके

राजकारणातील साधा माणूस- दादा पाटील शेळके

श्रद्धांजली विशेष /योगेश गुंड
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे शुक्रवारी (दि. २२) रात्री निधन झाले. राजकारणात राहुनही साधेपणा जपणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत!
चार वेळा आमदार, दोनदा खासदार, जिल्हा बॅँक, नगर साखर कारखान्याचे अध्यक्ष अशी राजकारणातील मोठमोठी पदे मिळूनही राहणीमानात व जीवनशैलीत काडीचाही बदल न झालेले जे काही तुरळक राजकीय नेते असतील त्यात ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांचे स्थान अव्वल आहे. त्यांच्या साध्या राहणीमानावर जनता, कुटुंबीय, कार्यकर्ते सतत कुणकुण करायचे पण दादा पाटलांनी आपल्या मूळ स्वभावात कधीच बदल होऊ दिला नाही. पांढरे कडक कांजीचे कपडे घालणे, सूट बुट घालणे, रूबाबात फिरणे अशा गोष्टीपासून ते शेवटपर्यंत दूर राहिले. खरे तर हेच त्यांच्या राजकीय यशाचे गमक ठरले. दादा पाटील शेळके यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गेल्या ५७ वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारर्किदीचा अस्त झाला.
दादा पाटील शेळके यांचे गाव खारेकर्जुने, नगरपासून बारा किमी अंतरावर. घरी सर्व शेती करायचे. दादा पाटीलही शाळेत असताना शेतीची कामे करायचे. विशेष म्हणजे आमदार, खासदार झाले तरी शेती करायची त्यांची आवड त्यांनी सोडली नाही. १९५८ मध्ये दहावी पास आणि त्यानंतर एक महिन्यांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची जबाबदारी पडल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच होती. शेतीत राबले तर खायला मिळे असे ते दिवस होते. यामुळे दादा पाटलांनी शेतीत स्व:तला झोकून दिले. १९६२ मध्ये दादा पाटील यांचे नाव पहिल्यांदाच मतदार यादीत आले. गावातील काही तरुणांनी ‘चांगला बोलतो, लोकांच्या कामाची आवड आहे’ या गुणावर त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे करण्याचा चंग बांधला. पण त्यांना कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नाही. मग त्यांच्यासमोर अपक्ष उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. १९६२ च्या जि. प. निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.
पंचायत राज व्यवस्था, ग्रामीण भागातील प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. लोक कामे घेऊन आल्यावर कोण, कोणत्या गावचा असे अस्थेने विचारपूस करत. लोकांनाही त्यांच्याबाबतीत आपुलकी वाटू लागली. पुढे १९६६ मध्ये ते पंचायत समितीचे सभापती झाले. तीन वेळा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले.
१९७८ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दादा पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले. पहिल्यांदाच त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. त्यांच्या निवडणुका लोकच हातात घेत हे विशेष. त्यावेळीही त्यांनी मोटारसायकलवर बसून प्रचार केला होता. आमदारकीचा सलग चौकार मारत त्यांनी नगर तालुक्यात आपले राजकीय स्थान पक्के केले. कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. सर्वांची कामे ते आवडीने करत. लोकांच्या कामासाठी अधिकाºयांना फोन लावून कळकळीची विनंती करायला ते विसरत नसत. अधिकाºयांना झापणे, त्यांची झाडाझडती असले प्रकार दादा पाटील यांनी कधीच केले नाहीत.
१९९४ मध्ये बाळासाहेब विखे-यशवंतराव गडाख यांच्या लोकसभा निवडणुकीचा वाद कोर्टात गेला. कोर्टाने निवडणूक रद्द केली. त्यावेळी दादा पाटील यांच्या गळ्यात दोनदा खासदारकीची माळ पडली. सत्ता आली पण सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात कधीच त्यांनी जाऊ दिली नाही. जिल्हा बॅँकेत त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. नगर साखर कारखाना त्यांनी मोठ्या कष्टाने उभा केला पण जास्त काळ टिकला नाही. दादा पाटील शेळके यांनी कधीच कुणाचा द्वेष, राग, कुणाला शिव्या शाप असले प्रकार केले नाही. त्यामुळे ते नेहमी जनतेच्या जवळ राहिले.
..तर शिक्षणमहर्षी झाले असते 
दादा पाटील शेळके यांनी तालुक्यात ४० माध्यमिक शाळांना मंजुरी मिळवून दिली. याच शाळा त्यांनी त्यांच्या संस्थेच्या नावाखाली काढल्या असत्या तर ते शिक्षण महर्षी झाले असते. पण त्यांनी सर्व शाळा गावातील जबाबदार लोकांच्या हाती सोपवल्या.
पैशांच्या राजकारणामुळे राजकीय पिछेहाट 
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यावेळी त्यांनी पैशांच्या या राजकारणात मी केवळ राजकीयदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या पराभूत झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. स्वार्थी लोकांची राजकारणात चलती सुुरू झाली असून खºया लोकांचे आता राजकारणात काम राहिले नाही अशी खंतही त्यांनी लोकमत जवळ अनकेदा व्यक्त केली होती.

Web Title: Simple guy in politics - Dada Patil shelves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.