सीना धरण ६२ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:24 PM2019-10-27T12:24:02+5:302019-10-27T12:24:51+5:30
सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणा-या दमदार पावसाने सीना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दोन वर्षानंतर धरण साठा ६२ टक्क्यांवर पोहचला आहे.
विनायक चव्हाण ।
मिरजगाव : सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणा-या दमदार पावसाने सीना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दोन वर्षानंतर धरण साठा ६२ टक्क्यांवर पोहचला आहे.
गेली दोन वर्षे भीषण दुष्काळाचा सामना केल्यानंतर परतीच्या पावसाने यंदा दिलासा दिला आहे. सीना नदी उगमस्थानी झालेल्या पावसाने धरणाची पाणी पातळी कमालीची वाढली. पावसाआधी कुकडीचे आर्वतन कर्जत तालुक्यात सुरू होते. त्यावेळी प्रशासनाने भोसेखिंडीतून कुकडीचे पाणी सीना धरणात सोडण्यात आले. कुकडीच्या आर्वतनातून ४४७.४७ दशलक्ष घनफूट पाणी धरणात आले. धरणातील पाणीसाठा ६२ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे भविष्यात रब्बीच्या पिकांना पाण्याची आवश्यकता भासल्यास धरणातून दोन आर्वतने मिळतील. अद्यापही परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. पाणी आवक अशीच सुरू राहिल्यास धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल. आठवडाभरापासून ससत पडणाºया पावसाने धरणाच्या लाभक्षेत्रातील कांदा, तूर, कपाशी, भुईमूग, मका, ज्वारी ही पिके धोक्यात आली आहेत.
सीना धरण दरवर्षी ओव्हरफ्लो होत नाही. त्यामुळे आवर्तन न मिळाल्याने लाभक्षेत्रातील पिके वाया जातात. धरण २०१० मध्ये ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर सात वर्षानंतर २०१७ मध्ये कुकडीच्या पाण्याचा ५० टक्के साठा व उर्वरित पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले होते. गतवर्षी हे धरण दोन वर्षांनी ओव्हरफ्लो होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यानंतर पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.
धरणातील पाणी पातळी
धरणाची क्षमता : २४०० दशलक्ष घनफूट, मृतसाठा- ५५२ दशलक्ष घनफूट, गाळ- १८४.०० दशलक्ष घनफूट, आजचा साठा- १५०२.३२ दशलक्ष घनफूट. पाणी पातळी- ७८१.४२ दशलक्ष घनफूट. कुकडीचे पाणी- ४४७.४७ दशलक्ष घनफूट. पावसाची आवक - १ हजार ५०० क्युसेक. टक्केवारी- ६२.५८