जिल्ह्यात ‘सिंघम’ अवतरणार; तत्काळ पोलीस मदत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:16+5:302021-05-24T04:20:16+5:30
अहमदनगर : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत हवी असल्यास ११२ डायल करा. अवघ्या १० ते २० मिनिटांत पोलीस घटनास्थळी ...
अहमदनगर : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत हवी असल्यास ११२ डायल करा. अवघ्या १० ते २० मिनिटांत पोलीस घटनास्थळी हजर राहतील, अशी अद्ययावत यंत्रणा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असून, नगरसह इतर जिल्ह्यातील काम अंतिम टप्प्यात आहे.
पोलीस दल सक्षम करून जनतेला तत्काळ सेवा देण्याच्या उद्देशाने गृह विभागाने आधुनिकतेवर भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस दलात काही महिन्यांपूर्वी नवीन वाहने दाखल झालेली आहेत तसेच इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान बसविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. ही सेवा कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तत्काळ घटनास्थळी मदतीसाठी ‘सिंघम’ अवतरणार आहे. ‘११२ डायल’ या नव्या उपक्रमामुळे पोलीस यंत्रणा आणखी सक्षम होणार आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस मदत मिळणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
...........
पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा
जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी थांबून ११२ नंबर डायल केल्यास काही वेळातच घटनास्थळी मदतीसाठी पोलिसांची मोबाइल व्हॅन यंत्रणेसह येईल.
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत होणार आहे. ही यंत्रणा २४ तास सतर्क राहणार आहे.
..........
‘कॉल’ येताच कळणार ‘लोकेशन’
राज्यातील कोणत्याही भागातून ११२ नंबरवर येणाऱ्या कॉलचे केंद्रीकरण नवी मुंबई व नागपूर अशा दोन भागांत केले जाणार आहे. त्यामुळे ११२ क्रमांकावर राज्यातील कोणत्याही खेडेगावातून कॉल आला तरी त्याचे तत्काळ लोकेशन मिळणार आहे. यावेळी त्या परिसरातील पोलिसांच्या बीटमार्शल मोबाइल व्हॅनला संदेश देऊन ते तत्काळ घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना दिल्या जातील.
........
सात वाहने आली
जिल्हा पोलीस दलात वर्षभरापूर्वी ११२ डायल उपक्रमासाठी सात अद्ययावत वाहने आलेली आहेत. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर गरजेनुसार आणखी वाहने मिळणार आहेत.
.......
२० कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
जिल्हा पोलीस दलातील २० पोलिसांना ‘११२ डायल’ या उपक्रमासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत कशी करावी. याबाबत हे प्रशिक्षण असून आणखी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे नियंत्रण कक्षाचे प्रमुख तथा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले.
.........
जिल्ह्यात 'डायल ११२' ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी पोलीस दलात काही वाहने आलेली असून, कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. इतर साधने बसविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित होईल.
- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक
.........
जिल्ह्यात एकूण पोलीस स्टेशन-३१
एकूण पोलीस कर्मचारी-२९२६
एकूण अधिकारी-१६५