सर, मी केलेली मदत कोणाला सांगू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:20+5:302021-05-20T04:22:20+5:30
देवदैठण : एका चिमुकल्याने कोविड रुग्णांसाठी कर्मवीरांच्या भूमीतून मदत करताना सर, मी केलेली मदत कोणाला सांगू नका, असा प्रेमाचा ...
देवदैठण : एका चिमुकल्याने कोविड रुग्णांसाठी कर्मवीरांच्या भूमीतून मदत करताना सर, मी केलेली मदत कोणाला सांगू नका, असा प्रेमाचा सल्ला वर्गशिक्षकांना दिला.
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिर पंचायत समितीच्या सदस्य कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे या दांपत्याने सुरू केले आहे.
येथे स्वयंसेवक म्हणून तरुण चोख जबाबदारी पार पाडत आहेत. यातील एक आहेत देवदैठणचे सुपुत्र संदीप बोरगे की जे सातारा येथे रयत शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक म्हणून काम करतात.
सुट्टी लागल्यानंतर ते गावी आले व या आरोग्य मंदिरात रुग्णसेवा करू लागले. ‘लोकमत’ने त्यांचे वृत्त प्रकाशित केले. ती बातमी साताऱ्यातील या १३ वर्षाच्या विद्यार्थ्याने सोशल मीडियावर वाचली.
आपले वर्गशिक्षक संकट काळात एवढी धडपड करतात हे पाहून सर्वसाधारण कुटुंबातील रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल सातारा येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या या चिमुकल्याने सर, मला कोविड सेंटरला मदत पाठवायची आहे, असा फोन केला. विद्यार्थ्याने साठविलेले ३२० रुपये शेजारच्या मोबाइलवरून आपल्या शिक्षकांकडे पाठविले व तुम्ही रुग्णसेवा करत असलेल्या कोविड सेंटरसाठी ही माझी छोटीशी मदत खर्च करा; पण.. ‘सर, मी केलेली मदत कोणाला सांगू नका’ पैशाबरोबर असा संदेशदेखील त्याने पाठवला.
190521\img_20210518_102049.jpg
संग्रहीत छायाचित्र