साहेब... किराणा, भाजीपाला संपलाय कारवाई नका करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:18+5:302021-04-13T04:19:18+5:30

अहमदनगर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. रुग्णालयात बेड मिळत नाहीत, इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. अशा ...

Sir ... groceries, don't run out of vegetables! | साहेब... किराणा, भाजीपाला संपलाय कारवाई नका करू!

साहेब... किराणा, भाजीपाला संपलाय कारवाई नका करू!

अहमदनगर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. रुग्णालयात बेड मिळत नाहीत, इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. अशा भयानक परिस्थितीत प्रशासन ही साथ आटोक्यात आणण्याचे कसोशीने प्रयत्न करत असताना काही रिकामटेकडे मात्र नियमांचे उल्लंघन करण्यातच धन्यता मानत आहेत. संचारबंदी असतानाही किराणा संपलाय, भाजीपाला आणायला चाललोय, गावाकडे अर्जंट जायचे आहे, पोटदुखीच्या गोळ्या घ्यायच्यात, असे एक से बढकर एक कारणे सांगत काही जण विनाकारण रस्त्यावर भटकंती करताना पोलिसांना आढळून आले.

ज्यांना वास्तविक रुग्णालय, मेडिकल अथवा इतर अत्यावश्यक काम आहे, अशांची विचारणा करून पोलिसांनी त्यांना जाण्यास परवानगी दिली. मात्र क्षुल्लक कारणे सांगून विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वीकेंड लॉकडायनच्या काळात शनिवार व रविवार असे दोन दिवस पोलिसांनी शहरासह जिल्हाभरात ८२२ जणांना ४ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार अशी दोन दिवस संचारबंदी लागू केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार करण्यास बंदी होती. शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांनी या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच थांबणे पसंत केले. काही जणांनी मात्र हा आदेश गांभीर्याने न घेता काहीतरी कारण काढून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांनीही अशा रिकामटेकड्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना चांगलाच दणका दिला.

.........

औषधे आणायला तिघांचे काय काम ?

संचारबंदीत तपासणीदरम्यान पोलिसांना बहुतांश जणांनी हॉस्पिटल व मेडिकलमध्ये जात असल्याचे कारण सांगितले. औषधे आणायला मात्र एका मोटारसायकलवर दोन ते तीन जण जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अशावेळी पोलिसांनी त्यांना समज देत एकाच व्यक्तीला जाण्याची परवानगी दिली. बहुतांश जणांनी खोटी कारणे सांगून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

............

शनिवारी झालेली कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४१४ जणांना २ लाख १८ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला.

..........

रविवारी झालेली कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०८ जणांना २ लाख ७४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

..............

दोन दिवसांच्या संचारबंदीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ज्यांना हॉस्पिटल, मेडिकलमध्ये काम आहे, त्यांच्यावर कुठल्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही. मात्र, जे विनाकारण फिरत होते, खोटे कारणे सांगत होते त्यांना कलम १८८ प्रमाणे प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला.

-किरण सुरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन

..........

ओळी- संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पाेलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

फोटो मेलवर आहे

Web Title: Sir ... groceries, don't run out of vegetables!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.