पाथर्डीत तहसीलदारांच्या दालनात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:21+5:302020-12-31T04:21:21+5:30
पाथर्डी : कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गाचे मेहकरी ते पाथर्डी (टाकळी फाटा) येथील काम अतिशय मंद गतीने सुरू आहे. या मार्गावर ...
पाथर्डी : कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गाचे मेहकरी ते पाथर्डी (टाकळी फाटा) येथील काम अतिशय मंद गतीने सुरू आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. दिशादर्शक फलक लावले नसून वाहधारकांच्या सुरक्षेची कुठल्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही. रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघात होऊन निष्पाप प्रवासी, वाहनधारकांचा बळी गेला. कालही याच महामार्गावर दोन अपघात होऊन चार प्रवाशांचा बळी घेतला. त्यामुळे अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीसाठी मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांच्या दालनात बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
संतोष जिरेसाळ म्हणाले, या महामार्गाच्या सदोष कामावर वाहनधारकांना किमान सुविधा देण्याबाबत ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केले आहे. २१ डिसेंबरला तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत उपअभियंता दि. ना. तारडे यांनी तातडीने या महामार्गाच्या कामात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ठेकेदार व महामार्ग प्रशासन यांनी आश्वासन पाळले नाही. त्यामुळे महामार्गावर झालेल्या अपघातात शेकडोंचे बळी गेले. देवराईजवळ खड्डे चुकविताना ट्रॅव्हल्स- बस व कार यांचा अपघात होऊन चार प्रवाशांचा मृत्यू झाला.
पाथर्डी शहर, देवराई गाव, माळीबाभळगावसह अनेक ठिकाणी तीन महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवला आहे. काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिशादर्शक व डायव्हर्शन फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
रणजित डेरे यांनाही दिले निवेदन
मनसेचे तालुका उपाध्यक्ष एकनाथ सानप, विभाग अध्यक्ष बाबा सांगळे, शहर सचिव संदीप काकडे, शहर उपाध्यक्ष राजू गिरी, संजय चौनापुरे, सामाजिक कार्यकर्ते कौतुक चिंतामणी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
फोटो : ३० पाथर्डी येथे तहसीलदारांना निवेदन देताना मनसेचे कार्यकर्ते.