श्रीरामपूरच्या अशोक कारखान्याचे सहा संचालक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:01 PM2018-04-10T19:01:42+5:302018-04-10T19:03:40+5:30
सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याच्या कारणावरून श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहा संचालकांना अहमदनगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी मंगळवारी अपात्र ठरविले. यात कारखान्याचे माजी अध्यक्ष गलांडे, थोरात व शिंदे यांच्यासह भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बबनराव मुठे यांचाही समावेश आहे. अपात्रतेमुळे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना हा धक्का मानला जातो.
अहमदनगर : सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याच्या कारणावरून श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहा संचालकांना अहमदनगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी मंगळवारी अपात्र ठरविले. यात कारखान्याचे माजी अध्यक्ष गलांडे, थोरात व शिंदे यांच्यासह भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बबनराव मुठे यांचाही समावेश आहे. अपात्रतेमुळे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना हा धक्का मानला जातो.
शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, अनिल औताडे, युवराज जगताप, सुरेश ताके, निवृत्ती पवार, बबनराव उघडे, दिलीप गलांडे, काँग्रेसचे राजेंद्र पाऊलबुद्धे, ईश्वर दरंदले, भरत आसने, भाजपचे अनिल भनगडे, राम पटारे, ज्ञानदेव थोरात यांनी याबाबत तक्रार केली होती.
२ फेब्रुवारी २०१८ रोजी याबाबत साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सुरेश गलांडे, रावसाहेब थोरात, आबासाहेब गवारे, बबनराव मुठे, दिगंबर शिंदे, मंगला पवार, पुंजाहरी शिंदे, भाऊसाहेब कहांडळ, दत्तात्रय नाईक, बापू त्रिभुवन, पोपटराव जाधव हे अकरा संचालक त्यांच्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याचे व राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेला असल्याने ते थकबाकीदार ठरतात. त्यामुळे सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार संचालक म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांचे संचालक पद रद्द करावे, अशी तक्रार करण्यात आली होती. त्यासोबत तक्रारदारांनी या संचालकांच्या थकबाकीची कागदपत्रे पुराव्यादाखल सादर केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन प्रादेशिक सहसंचालक डोंगरे यांनी संबंधित संचालकांना म्हणणे मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार या संचालकांनी सहसंचालकांसमोर आपले लेखी म्हणणे सादर केले होते. या प्रकरणाची अंतिम सुनावणी मंगळवारी होऊन सहसंचालक डोंगरे यांनी सहा संचालकांना अपात्र ठरविणारा आदेश दिला.
हे संचालक ठरले अपात्र
सुरेश गलांडे, रावसाहेब थोरात, आबासाहेब गवारे, बबनराव मुठे, दिगंबर शिंदे, सुलोचना पवार.
हे संचालक ठरले पात्र
पुंजा हरी शिंदे, भाऊसाहेब कहांडळ, दत्तात्रय नाईक, बापू त्रिभुवन, पोपटराव जाधव
असा आहे आदेश
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ (ए) (१) (बी) नुसार अपात्रता धारणा करीत असल्यामुळे या सहा जणांंना संचालक पदावरून कमी करण्यात येत आहे.
-संगीता डोंगरे, प्रादेशिक सहसंचालक (साखर), तथा सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर.