बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:04 PM2018-08-10T16:04:43+5:302018-08-10T16:05:08+5:30
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील रंगनाथ किसन हासे या शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या फस्त केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
राजूर : अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील रंगनाथ किसन हासे या शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या फस्त केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
या बाबत येथील वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, रंगनाथ हासे यांच्या वस्तीवर शेळ्यांसाठी पत्र्याची शेड आहे. त्याच्या सभोवताली जाळी लावलेली असून एक कोपरा उघडा आहे. या शेडच्या मागील बाजूने बुधवारी रात्री झेप घेत बिबट्या शेडमध्ये गेला. यात त्याने या शेतकºयाच्या पाच शेळ्या व एक बोकड अशा एकूण सहा शेळ्या ठार मारल्या. सकाळी ही बाब लक्षात येताच रंगनाथ हासे यांनी येथील वन विभागाशी संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच वन क्षेत्रपाल दिलीप जाधव यांच्या सूचनेनुसार वनपाल बी. एस. मुठे, वनरक्षक निलेश कोळी, वन कर्मचारी भरत हासे व बालचंद भोर हे घटनास्थळी पोहोचले. घडलेल्या घटनेची माहिती घेत त्यांनी पंचनामा केला. यात या शेतक-याचे सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. पशुधन वैद्यकीय अधिकारी राम जाधव आणि पी. डी. भांगरे यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली.