मिरचीतून सहा महिन्यात सहा लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:51 PM2018-07-20T12:51:00+5:302018-07-20T12:51:34+5:30
राहाता तालुक्यातील शिंगवे येथील प्रमोद बाबासाहेब आग्रे यांनी एक एकर हिरवी मिरचीच्या उत्पन्नातून सहा महिन्यात साडे ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
प्रल्हाद मेहरे
राहाता : राहाता तालुक्यातील शिंगवे येथील प्रमोद बाबासाहेब आग्रे यांनी एक एकर हिरवी मिरचीच्या उत्पन्नातून सहा महिन्यात साडे ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
शिंगवे येथील आग्रे यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला एक एकर सेमिनस-४८८४ या मिरचीच्या वाणाची लागवड केली. एका एकरात ६ फुटाची सरी घेऊन २ फूट अंतरावर साडेपाच हजार रोपांची लागवड केली.
लागवडी अगोदर १० ट्रॉली शेणखत शेतात वापरले. ठिबक व मल्चिंग पेपर टाकण्यात आला. तार व बांबूमुळे झाडांची उंची ५ फूट इतकी आहे. फेब्रुवारी महिन्यात मिरची तोडणीची सुरुवात केली.
सरासरी रोज ३ ते ४ क्विंटल मिरची तोडून मार्केटला जात होती. कमीत कमी २५०० ते ३००० रुपये क्विंटल भाव मिळत होता. वाळलेली लाल मिरची १५ क्विंटल इतकी निघाली. मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपर, ठिबक, तार, बांबू असा सर्व खर्च सव्वा लाख रुपये आला. मिरची तोडणीचा खर्च वजा जाता सहा महिन्यात साडे ५ ते ६ लाख रुपये उत्पन्न मिळाले.