पाठलाग करून सहा दरोडेखोरांना केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:12+5:302021-06-16T04:29:12+5:30
सोनईत आठ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. गस्तीसाठी गावातील १३० युवकांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले. सोबतीला पोलीस ...
सोनईत आठ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. गस्तीसाठी गावातील १३० युवकांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले. सोबतीला पोलीस पथक, मुळा एज्युकेशन व मुळा कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी रात्रीची गस्त घालत होते. चार, पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न व एका युवकावर चोरट्यांनी हल्ला केला होता.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मोरेचिंचोरे बसस्थानक येथे एक संशयित टाटा सफारी कार दिसल्यानंतर युवकांनी गाडीचा पाठलाग केला. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, पोलीस पथक व ग्रामसुरक्षा दलाचे शंभरहून अधिक युवक मोरेचिंचोरे येथील शेतात पोहोचले. भगवान अंबादास इलग यांच्या शेडमध्ये कार लावून चोरटे पळाले. मात्र, युवक व पोलिसांनी सहा आरोपीस पाठलाग करून पकडले. धर्मेंद्र शिवनारायण सोळंकी (वय २५), अजय दिनेश मालवीय (२०), समीर नूरमहंमद खान (२३), राकेश रामलाल सोळंकी (२२), मिथुन शिवनारायण सोळंकी (२०), अशोक रामचंद्र मालवीय (२० सर्व राहणार दुपाडा, ता. बडोदिया, जि. साजापूर मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे असून त्यांच्याकडून दोन चाकू, दोन कटावणी, लोखंडी गज, लाकडी दांडे, तसेच तीन ड्रम डिझेल जप्त केले आहे.
या दरोडेखोरांना पकडण्यासाठी अक्षय म्हसे, सचिन चांदघोडे, शैलेश दरंदले, दिनेश चव्हाण, सखाराम राशिनकर यांच्यासह यश ग्रुप, महेश मंडळासह गावातील विविध मंडळांच्या युवकांनी व सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, रवींद्र लबडे, बाबा वाघमोडे, अमोल जवरे, गोरख जावळे, ज्ञानेश्वर आघाव, सचिन ठोंबरे, होमगार्ड शिंदे व दरंदले यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.