अहमदनगर जिल्ह्यात सहा तालुके शिवथाळीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:59 AM2020-05-21T11:59:31+5:302020-05-21T11:59:38+5:30
अहमदनगर : प्रत्येक तालुक्यात शिवथाळी केंद्र सुरू करण्याच्या शासन निर्णयाला जिल्ह्यातील सहा तालुक्यांनी अद्यापही प्रतिसाद न दिल्याने येथे शिवथाळीचा घास गरजूंच्या मुखापर्यंत गेलेला नाही. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहाता व संगमनेर या सहा तालुक्यांत तेथील तालुका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शिवथाळीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : प्रत्येक तालुक्यात शिवथाळी केंद्र सुरू करण्याच्या शासन निर्णयाला जिल्ह्यातील सहा तालुक्यांनी अद्यापही प्रतिसाद न दिल्याने येथे शिवथाळीचा घास गरजूंच्या मुखापर्यंत गेलेला नाही. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहाता व संगमनेर या सहा तालुक्यांत तेथील तालुका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शिवथाळीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे गरजूंना १० रूपयांत भोजन देण्याचा शब्द सरकार स्थापन केल्याबरोबर खरा केला. प्रारंभी जिल्ह्याच्या ठिकाणी १० रूपयांत जेवण देण्याची व्यवस्था करून याला शिवथाळी असे नाव देण्यात आले. नगर शहरात मार्चपर्यंत १० केंद्रांवर ही शिवथाळी सुरू करण्यात आली. परंतु पुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब जनता भुकेली राहू नये, यासाठी या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याप्रमाणे १ एप्रिलपासून प्रत्येक तालुक्यात दीडशे थाळी व जिल्ह्याच्या ठिकाणी असणाºया केंद्रांवर थाळीसंख्या दुप्पट करण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या अधिपत्त्याखाली हे काम सुरू असून त्यांनीही आदेश देत प्रत्येक तहसीलदारांना ही केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आठ तालुक्यांत ही केंद्रे सुरू झाली, मात्र दीड महिना लोटला तरी पाथर्डी, शेवगाव, जामखेड, संगमनेर, श्रीरामपूर व राहाता येथे शिवथाळीचा स्वाद गरजूंपर्यंत गेलेला नाही. जिल्हा पुरवठा विभागाने वारंवार सूचना देऊनही तालुका प्रशासन दाद देत नसल्याचे यावरून लक्षात येते. शासन स्वत: अनुदान देत आहे. अनेक हॉटेलचालक हे केंद्र चालवण्यासाठी पुढे येत आहेत. मग तालुका प्रशासनाला अडचण कशाची आहे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
---
तालुका प्रशासन पुरवठा विभागाला दाद देईना
नगर शहरात १२ व आठ तालुक्यांच्या ठिकाणी असे एकूण २० ठिकाणी सध्या शिवथाळी केंद्र सुरू आहेत. तेथे सुमारे ४७०० थाळ्यांचे वाटप सुरू आहे. सहा तालुक्यांना सूचना देऊनही त्यांनी केंद्र सुरू केलेले नाही. याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती पुरवठा विभागाकडून समजली. मात्र तालुका प्रशासन पुरवठा विभागाला दाद देत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.