साठ हजार जनावरांचा पोळा यंदा छावणीतच : चार तालुक्यात ९४ छावण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 04:46 PM2019-08-28T16:46:58+5:302019-08-28T16:47:15+5:30
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणी व चाराटंचाई निर्माण झाली असून ऐन पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात ९४ छावण्या सुरू आहेत.
अहमदनगर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणी व चाराटंचाई निर्माण झाली असून ऐन पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात ९४ छावण्या सुरू आहेत. या छावण्यांत एकूण ६० हजार जनावरे आहेत. कर्जत, पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक छावण्या व जनावरे आहेत. चारा आणि पाण्याअभावी यंदा साठ हजार जनावरांचा पोळा छावणीतच साजरा होणार आहे.
बैलपोळा या सणाला शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्व आहे. यंदा या सणावर कमी पावसाचे सावट आहे. शुक्रवारी (दि.३०) पोळा असल्याने छावणीतील जनावरे घरी येतील की नाही, याची शेतकऱ्यांनाच खात्री नसल्याची स्थिती आहे. मागील वर्षी जिल्ह्यात पाऊस न झाल्याने यंदा तीव्र चाराटंचाई जाणवली. त्यामुळे शासनाने फेब्रुवारीमध्ये जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. उन्हाळ्यात गावोगावी छावण्या पहायला मिळाल्या. हा आकडा साडेपाचशेपर्यंत गेला होता. त्यात सुमारे सव्वा तीन लाख जनावरे होती. परंतु जून-जुलैमध्ये काही भागात झालेल्या पावसाने बºयाच छावण्या बंद झाल्या. काही ठिकाणी शेतकºयांनी मशागतीसाठी जनावरे घरी नेल्याने छावणीचालकांना छावण्या बंद कराव्या लागल्या. तर काही ठिकाणी प्रशासनानेच छावण्या बंद करण्यासाठी दबाव आणला, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला. नवीन चारा निर्माण झालेला नसतानाही जुलै-आॅगस्ट महिन्यात झपाट्याने छावण्या बंद होऊ लागल्या. सद्यस्थितीत त्या ९४ आहेत. यामध्ये ६ हजार ४९ लहान, तर ५१ हजार ८१२ मोठी अशी एकूण ५७ हजार ८६१ जनावरे दाखल आहेत. जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांत छावण्या सुरू आहेत. त्यातही कर्जतमध्ये सर्वाधिक ३६ छावण्या आहेत. नगर, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांतील छावण्या शासनाने बंद केल्या आहेत. शासनाने ३१ आॅगस्टपर्यंत छावण्यांची मुदत ठेवलेली आहे.