राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रात मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळूउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:54 PM2018-05-08T16:54:16+5:302018-05-08T16:56:32+5:30
मुळा नदीपात्रात सध्या मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळू उपसण्याची धडपड सुरू आहे. नदीपात्रातील पाण्यात बुड्या मारून रोजंदारीवर मजूर वाळू बाहेर काढीत आहेत़ पाण्यातून बाहेर काढलेली वाळू काठावर टाकण्याची जबाबदारी महिलांवर असल्याचे चित्र आहे. येथे चार मजुरांना एका वाहनापोटी दोन ते अडीच हजार रुपये मिळत आहेत.
भाऊसाहेब येवले
राहुरी : मुळा नदीपात्रात सध्या मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळू उपसण्याची धडपड सुरू आहे. नदीपात्रातील पाण्यात बुड्या मारून रोजंदारीवर मजूर वाळू बाहेर काढीत आहेत़ पाण्यातून बाहेर काढलेली वाळू काठावर टाकण्याची जबाबदारी महिलांवर असल्याचे चित्र आहे. येथे चार मजुरांना एका वाहनापोटी दोन ते अडीच हजार रुपये मिळत आहेत.
गेल्या साडेतीन दशकांपासून मुळा नदीपात्रातून वाळूची वाहतूक सुरू आहे़ वाळूच्या उपशामुळे नदीचे पात्र २५ फूट खोल गेले आहे़ वाळू संपण्याच्या मार्गावर असताना मिळेल तेथून वाळू काढण्यासाठी मजुरांची धडपड सुरू आहे़ वाळू उचलेगिरीवर सर्वजण टीका करीत असले, तरी त्यामध्ये पोटाची खळगी भरणारे मजूर खरे कष्टाळू आहेत़ ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता वाळू उचलण्याचे काम केले जात आहे़ त्यामध्ये आता महिलाही पुढे सरसावल्या आहेत़
दोन पुरुष व दोन महिला मिळून एक टेम्पोभर वाळू उपसा करतात़ हे काम नदीपात्रात ठिकठिकाणी सुरू आहे़ वाळू उचलेगिरी म्हटले, की केवळ पुरुषांची मक्तेदारी होती़ मात्र गेल्या काही दिवसांपासून महिला वाळू उचलण्यास पुढे येत आहेत़ मुळा नदीमध्ये वाळू पाण्यात आढळून येत आहे़ मध्यंतरी पाच बंधाऱ्यांसाठी नदीपात्रातून पाणी सोडण्यात आले होते़ सध्या पाणी नदीपात्राच्या अनेक खड्ड्यांत आहे़ सदरहून तळेरूपी खड्ड्यांत असलेल्या पाण्यातून वाळू बुड्या मारून काढली जात
आहे़
टोकरी व ताटली घेऊन मजूर पाण्यात बुड्या मारतात़ बुडी मारल्यानंतर ताटलीच्या सहाय्याने वाळू टोकरीत भरली जाते़ वाळूची टोकरी भरली की पाण्याच्या वर यायचे़ तोपर्यंत श्वास रोखून ठेवला जातो़ एकदा की पाण्याच्या बाहेर पडले की कोंडलेला श्वास घेऊन वाळू घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या हातात टोकरी दिली जाते़ टोकरी घेऊन पाण्यातून मार्ग काढीत महिला बाहेर येते़ नदीकाठच्या कडेला वाळूचा ढिग केला जातो़
मजुरांकडे प्राणायामची कला
पाण्यात बुडी मारून कुंभक केला जातो. त्यानंतर पाण्यातून बाहेर आल्यावर रेचक हा प्राणायमचा प्रकार करण्याची कला मजुरांकडे आहे़ पाण्यातून वाळू बाहेर काढणे व ढीग घालणे ही प्रक्रिया उन्हातान्हात सुरू असते़ दिवसभर वाळू उचलल्यानंतर एका टेम्पोत ही वाळू भरून दिली जाते़ एका टेम्पोचे चार मजुरांना दोन हजार रुपये मजुरीपोटी मिळतात. उन्हाळ्यात मुळा नदी म्हटले की खरबूज, टरबूज व काकडी यांच्या वाड्यांची रेलचेल असायची़ आता वाड्यांची जागा पान्हाडाने घेतली आहे़ नदीचे पात्र खोल गेल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे़ विहिरींचे तळ वर व नदीचे पात्र खोल अशी अवस्था निर्माण झाली आहे़