आठवडे बाजारातील छोटा व्यावसायिक कोलमडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:13+5:302021-05-25T04:23:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी : ग्रामीण अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यवहाराचे सर्वात मोठे ठिकाण आठवडे बाजार आहे. यामध्ये शेतमाल, कारागिरी कलाकुसर, ...

The small business in the market collapsed during the week | आठवडे बाजारातील छोटा व्यावसायिक कोलमडला

आठवडे बाजारातील छोटा व्यावसायिक कोलमडला

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी : ग्रामीण अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यवहाराचे सर्वात मोठे ठिकाण आठवडे बाजार आहे. यामध्ये शेतमाल, कारागिरी कलाकुसर, जोड व्यवसाय, पाळीव प्राणी-पक्षी खाद्यान्न, कपडे, भाजीपाला यांची खरेदी-विक्री होते. तसेच आठ दिवसात जो व्यवहार झालेला आहे, त्याची देवाण-घेवाण होते. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आघात ग्रामीण अर्थ व समाजव्यवस्थेवर झालेला दिसून येत आहे.

गेल्या वर्षापासून कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे आठवडे बाजार बंद असल्याने त्यात व्यवसाय करणाऱ्या सर्वच लहान व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पिढ्यान्‌ पिढ्यांपासून आठवडे बाजारात व्यवसाय करणाऱ्यांना उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय शोधावा लागत असल्याची स्थिती आहे. मागील चार महिन्यांपासून तर कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी बाजार बंद करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागाच्या आर्थिक व्यवहाराची मुख्य नस असलेला आठवडे बाजार बंद पडल्याने ग्रामीण जीवनावर खूप मोठे परिणाम झालेले आहेत. छोटा व्यावसायिक, व्यापारी, कारागीर, हमाल, दलाल, भटका, कलाकुसर करणारा, मनोरंजन करणारा अक्षरशः भरडला आहे. बाजारासोबतच यात्रा, लग्न, सण, समारंभ व धार्मिक कार्यक्रमही बंद असल्याने या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

----------

कटलरी विक्री हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. मी आठवड्यातून चार बाजार करते. मार्च महिन्यात मी स्वतः उसनवारीने पैसे घेऊन माल भरला. लग्नसराई सुरू झाली होती, पण कोरोनामुळे टाळेबंदी झाल्याने सर्व माल घरात पडून आहे. खेड्यात जाऊन विक्री करण्याचा प्रयत्न केला, तर गावकरी येऊ देत नाहीत. आता उसनवारीने घेतलेले पैसे नातेवाईक मागत आहेत. पण मी देऊ शकत नाही. मजूर म्हणून काम करण्याचे ठरविले, पण काम उपलब्ध नाही. आज माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

- सावित्रीबाई लोखंडे, कटलरी सामान विक्रेती, लोणी

----------

मी आठवडे बाजारात अल्पोपाहाराचे दुकान लावतो. राहाता तालुक्यातील एक व श्रीरामपूर तालुक्यातील एक आठवडा असे दोन बाजार करतो. लग्न व इतर कार्यक्रमात स्वयंपाकी म्हणून काम करतो. मात्र टाळेबंदी लागल्याने घरीच आहे. हॉटेल व्यवसायासाठी घेतलेला किराणा माल घरीच खाल्ला आहे. लग्नसमारंभ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाले. इतर कार्यक्रमही बंद असल्याने स्वयंपाकी म्हणून मिळणारी मजुरीही बुडाली. उसनवारीने व बचत गटाचे पैसे घेतले आहेत. मात्र बाजार बंद असल्याने या पैशाची परतफेड करण्याची चिंता आहे.

- अशोक भावसार, हॉटेल व्यावसायिक, श्रीरामपूर

----------

माझा वडिलोपार्जित कपडे शिवून विकण्याचा व्यवसाय आहे. राहाता तालुक्यातील लोणी, राहाता, कोल्हार व श्रीरामपूर तालुक्यातील एक असे चार आठवडे बाजारात दुकान लावतो. लॉकडाऊनच्या अगोदर ८० हजाराचा माल भरला. खेड्यांवर जाऊन कपडे विकण्याचा प्रयत्न केला. पण विक्री झाली नाही. व्यापारी पैसे घेण्यासाठी घरी येत आहेत, पण बाजारच बंद असल्याने मी पैसे देऊ शकत नाही. मुलीचे एक वर्षापूर्वी लग्न झाले. त्या खर्चातून मी सावरलेलो नाही. बाजार कधी सुरू होतील याचीच वाट पाहत आहे.

- राजेंद्र नायकिल, रेडिमेड कपडे विक्रेता, बेलापूर, ता. श्रीरामपूर

-------------

१५ वर्षांपासून आठवडे बाजारात फळे विक्रीचा व्यवसाय करतो. प्रत्येक बाजारला ५०० ते ७०० रुपये नफा मिळतो. या व्यवसायात ५० ते ६० हजाराची गुंतवणूक केली होती. मार्च महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने बँकेत बचत केलेले रुपये घरखर्चासाठी वापरले. आता बाजार सुरू झाल्यावर बँका कर्ज देत नसल्याने खासगी सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही.

- मोजीमभाई इनामदार, फळे विक्रेता, राहाता

240521\4telharas_20bajar.webp

लोणी(ता.राहाता) येथे भरणा-या आठवडे बाजारचे संग्रहित छायाचित्र....

Web Title: The small business in the market collapsed during the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.