लोकसभा निवडणुकीसाठी येणार स्मार्ट ईव्हीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:45 AM2018-07-16T05:45:07+5:302018-07-16T05:45:10+5:30
निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी आता अत्याधुनिक आठ हजार मतदान यंत्र मिळणार आहेत.
अहमदनगर : निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी आता अत्याधुनिक आठ हजार मतदान यंत्र मिळणार आहेत. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्र बंगळुरूहून नगरला दाखल होत आहेत. मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचा डाटा या मशिनमध्ये असणार आहे.
पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशा नव्या एम ३ संरचनेची यंत्र वापरण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतही अशीच अत्याधुनिक मशीन वापरण्यात आली आहेत.
नव्या मतदान यंत्रांचे वैशिष्ट्य
या मशिनला व्हीव्हीपॅट प्रणाली जोडण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाची माहिती असलेली चिठ्ठी मिळेल. मतदाराला ही माहिती काही वेळ तेथील स्क्रीनवरही दिसेल. एकाच कंट्रोल युनिटला २४ बॅलेट मशीन जोडता येणे शक्य आहे. पूर्वीच्या मशीनवर ही क्षमता केवळ ४ मशीनची होती.
>निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात अत्याधुनिक एम ३ संरचनेचे मशिन नगरला प्राप्त होत आहेत. ही यंत्र केडगाव व राहुरी विद्यापीठातील गोडाऊनमध्ये ठेवण्यात येतील.
- अरूण आनंदकर,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी