सुखी संसारात स्मार्टफोन कालवतोय बिब्बा
By अरुण वाघमोडे | Published: December 23, 2018 11:01 AM2018-12-23T11:01:37+5:302018-12-23T11:01:40+5:30
बहुतांशीवेळा क्षुल्लक कारणांतून पती-पत्नीत वाद होतात़ हे वाद मात्र क्षणिक असतात़ स्वारी म्हटले की, पुन्हा संसाराचा गाडा रूळावर येतो
अरुण वाघमोडे
अहमदनगर : पती-पत्नीच्या वादात एकेकाळी सासरी पती, सासू-सासऱ्याकडून त्रास, हुंड्यासाठी छळ, पतीचे व्यसन, विवाहबाह्य सबंध हे कळीचे मुद्दे ठरत होते. बदल्या काळात मात्र ‘मोबाईल आणि सोशल मीडिया’ संसार तुटण्यास कारणीभूत ठरत आहे.
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने महिलांसाठी चालविल्या जाणा-या दिलासा सेलकडे १५ आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ या काळात एकूण पती-पत्नीच्या वादातून २२३५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. दिलासा सेलकडून झालेल्या समुपदेशनातून यातील ७५४ जोडप्यांनी आपसातील वाद मिटविले आहेत. ४६६ जणांनी स्वतंत्र निर्णय घेतला आहे. २१५ प्रकरणे गुन्हा दाखल पात्र ठरली आहेत.
८ जणांना मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे तर ७ जोडप्यांनी घटस्पोट घेतला आहे. एकूण दाखल तक्रांरीपैकी ४५ ते ५० टक्के प्रकरणात मोबाईल हेच वादाचे कारण समोर आले आहे.
बहुतांशीवेळा क्षुल्लक कारणांतून पती-पत्नीत वाद होतात. हे वाद मात्र क्षणिक असतात़ स्वारी म्हटले की, पुन्हा संसाराचा गाडा रूळावर येतो. गेल्या काही वर्षांत मात्र या नाजूक नात्याला ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे. दिलासा सेलकडे गेल्या वर्षभरात पती-पत्नीच्या वादातून दाखल झालेल्या २२३५ तक्रारींपैकी ९०० जोडप्यांनी मोबाईल हेच वादाचे कारण नमूद केले आहे. मोबाईलमुळे काडीमोडपर्यंत आलेल्यांमध्ये नवविवाहितांची सर्वाधिक संख्या आहे.
१५ आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ - २२३५ - तक्रारी दाखल
पत्नींच्या तक्रारी
पती तासनंतास मोबाईलवर बोलतो, आॅफिसमधून घरी आल्यानंतर व्हाटसअॅप आणि फेसबुकवर व्यस्त असतो, मला वेळ देत नाही, माझ्यापेक्षा त्याला त्याच्या व्हाटसअॅपवरील मैत्रिणी महत्त्वाच्या वाटतात, समजावून सांगितले तर माझ्यावरच रागावतो, मुलांना वेळ देत नाही, घरातील सर्व कामे मलाच करावे लागतात, मला त्याच्या मोबाईल पाहून देत नाही, त्याच्या मोबाईलचा पासवर्ड सांगत नाही. माझी त्याला कदरच नाही, माझी भावना तो समजून घेत नाही. तो आता माझ्यावर पहिल्यासारखं पे्रम करत नाही, मोबाईल ‘माझी सवत’ झाली आहे.
पतींच्या तक्रारी
आॅफिसमधील कारणांमुळे फोनवर बोलावे लागते, व्हॉटसअप गु्रप हा आता व्यवसायाचा भाग झाला आहे. ‘ती’ शुल्लक कारणातून सतत कटकट करत असते. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून संशय घेते. मी तिला घरात काहीच कमी पडू देत नाही. माझ्यापेक्षा ती जास्त मोबाईलवर बोलते, तिच्या जुन्या मित्रांच्या ती संपर्कात आहे, माहेरी जास्त बोलते, तिच्या नातेवाईकांमध्ये माझी तिने बदनामी केली आहे. ती घरी असते तिला कशाला हवा स्मार्ट फोन, हिच्यामुळे माझे वैयक्तिक आयुष्य संपून चालले आहे. हिच्या कटकटीला मी आता वैतागलो आहे.
मुलांची फरपट
पती-पत्नीतील भांडण विकोपाला गेल्यानंतर हा वाद प्रथम नातेवाईकांकडे जातो़ तेथे काहीच तोडगा निघाला नाही. तर पत्नी थेट माहेरी निघून जाते़ वाद आणखी वाढतो. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारी आणि हे प्रकरण दिलासा सेलकडे येते. दिलासा सेलमध्ये पती-पत्नी व त्यांच्या नातेवाईकांना एकत्र बोलावून समजावून सांगितले जाते. यातील काही जण आपसातील वाद मिटवून घेतले आहेत तर काहीचें वाद थेट विकोपाला गेल्याने ‘घटस्पोट’ हाच पर्याय त्यांनी निवडला आहे़ यामध्ये त्यांच्या मुलांची फरपट होत आहे.
पती-पत्नींमध्ये मोबाईलमुळे वाद होण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोबाईल हे कारण क्षुल्लक वाटत असले तरी याच कारणातून सुखी संसार विस्कटलेले दिसतात़. दिलासा सेलकडे आलेल्या जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांच्या नातेवाईकांनाही समजावून सांगितले जाते. घटस्पोटाचे दुष्परिणाम त्यांना सांगितले जातात. यातून अनेकांचे प्रबोधन होते़ काही प्रकरणात वाद विकोपालाच गेला असते तर संबंधित महिलेला कायदेशीर मदत केली जाते. - कल्पना चव्हाण, निरीक्षक, दिलासासेल