ST मधून धूर, प्रवाशांत भीती; शिवशाहीतून बाहेर पडण्यासाठी गर्दी करत पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 02:54 PM2023-05-20T14:54:49+5:302023-05-20T14:56:39+5:30
पुण्याहून नाशिककडे निघालेल्या शिवशाही बसच्या ए.सी. कॉम्प्रेसर मधून अचानक धूर निघू लागला
घारगाव (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही या वातानुकूलित बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे ही बस चर्चेत आहे. पुण्याहून नाशिकला शनिवारी (२० मे) दुपारी सव्वा बारा वाजता प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसमधून संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात अचानक धूर निघू लागल्याने बसचालकाने जागेवरच बस थांबवली. प्रवाशांनीही भीतीपाेटी लागलीच बसमधून बाहेर पडण्यासाठी गर्दी करीत एकच पळापळ झाली.
पुण्याहून नाशिककडे निघालेल्या शिवशाही बसच्या ए.सी. कॉम्प्रेसर मधून अचानक धूर निघू लागला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. एम.एच. ०६ बी. डब्लू. ०६४९ या क्रमांकाची पिंपरी चिंचवड आगाराची ही शिवशाही बस होती. ही शिवशाही बस नाशिक-पुणे महामार्गाने नाशिकला ४५ प्रवाशी घेऊन जात असताना संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान आली असता याच वेळी बसच्या पुढील भागातून धूर निघून लागला. चालक आकाश अरविंद गायकवाड यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी जागीच थांबवली आणि आतील प्रवासी घाबरून बाहेर आले. यावेळी बाहेर पडलेल्या प्रवाशांना बस पेट वगैरे घेते की काय अशी भीती वाटू लागली