..तर उत्पादन वाढण्यास मदत होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:04+5:302021-08-24T04:26:04+5:30
राहुरी : हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर येणाऱ्या नैसर्गिक समस्यांचे निवारण करण्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला सेवा या तंत्रज्ञानाचा योग्य ...
राहुरी : हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर येणाऱ्या नैसर्गिक समस्यांचे निवारण करण्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला सेवा या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कृषी उत्पादन वाढ होण्यास मदत होईल, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी सांगितले.
जागतिक बँक अर्थसाहाय्यित, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने, हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत माहिती आणि दळणवळणाच्या साधनांद्वारे हवामानावर आधारित कृषी सल्ला सेवा या विषयावर तीन आठवड्यांच्या विशेष अभ्यासाचा समारोप कुलगुरू पाटील यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनाने करण्यात आला. कार्यक्रमास हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विनोदकुमार सिंग, अशोक फरांदे, शरद गडाख, राजीव अहल आदी उपस्थित होते.
डॉ. विनोदकुमार सिंग म्हणाले, हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर मोठे परिणाम होत आहेत. यावर केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने विविध संशोधने केली आहेत. यात जिल्हानिहाय आपत्कालीन पीक व्यवस्थापन, हवामान संवेदनक्षम गावे, पाणी व्यवस्थापन व पीक दिनदर्शिका यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कार्यक्रमाचे संयोजन सुनील गोरंटीवार, इंद्रनील घोष, मुकुंद शिंदे, रणजित जाधव, रवी आंधळे, जयवंत जाधव यांनी केले. यात देशभरातून एकूण १०७ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यांना कृषी हवामानशास्त्र विषयातील देशभरातील ३५ तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
.........
राहुरी येथे ऑनलाईन कार्यशाळेत बोलताना राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील.