...तर नागवडेंना राजकीय संन्यास घ्यायला लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:45+5:302021-03-28T04:19:45+5:30

श्रीगोंदा : नागवडे घराण्याने पाच दशके सहकारी साखर कारखानदारीत विश्वासार्हता जोपासण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे आणि बँकांचे ...

... so let's get Nagwade to retire politically | ...तर नागवडेंना राजकीय संन्यास घ्यायला लावू

...तर नागवडेंना राजकीय संन्यास घ्यायला लावू

श्रीगोंदा : नागवडे घराण्याने पाच दशके सहकारी साखर कारखानदारीत विश्वासार्हता जोपासण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे आणि बँकांचे हप्ते वेळेवर फेडण्याचे काम केले आहे. विरोधकांनी नागवडेंच्या दोन टेक्स्टाइल मिल, खासगी दोन साखर दाखविले, तर आपण नागवडेंना राजकीय संन्यास घ्यायला लावू. मात्र, केवळ विरोधास विरोध करण्यासाठी विरोधकांनी खोटे आरोप करू नयेत. यापुढे खोटारड्यांना जशास तसे उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर नागवडे साखर कारखान्याचे संचालक विलासराव काकडे यांनी विरोधकांना दिले.

केशव मगर, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यावर चौफेर टीका केली होती. त्यांच्या टीकेला काकडे यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले.

काकडे म्हणाले, केशव मगर यांना कारखान्याचे उपाध्यक्ष करण्यासाठी आम्ही शिफारस केली. आता त्यांनी स्वत:ला काही मिळाले नसल्याने विरोधी भूमिका घेतली आहे.

सभासदांच्या पैशातून शिवाजीराव नागवडे यांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते सहकारी मित्र पाच वर्षांत पाच वेळाही कारखान्यावर आले नाहीत. त्यांनी आता स्मारकासाठी ४२ लाखांचा मुरूम टाकल्याचा खोटा आरोप केला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यंदा साखर कारखान्याकडे १० लाख मे. टन उसाची नोंद असताना केवळ पाच लाख मे. टन उसाचे गाळप करता आले. इतर ऊस शेजारील साखर कारखान्यांनी नेला आहे. श्रीगोंदा, शिरूर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पाच हजार मे. टन विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संचालक मंडळाची मान्यता घेतली आहे, तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली आहे, असे काकडे यांनी सांगितले.

--

घनश्याम शेलारांनी शेजाऱ्यांना सल्ला द्यावा...

नागवडे कारखाना विस्तारीकरणास विरोध करणाऱ्या घनश्याम शेलार यांच्या शेजारचे साखर कारखाने विस्तारीकरण करत आहेत. शेलारांनी शेजाऱ्यांना सल्ला द्यावा.

शिवाजीराव नागवडे यांच्या विश्वासास पात्र अशी कामगिरी राजेंद्र नागवडे यांनी केली आहे. सभासदांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली नागवडे साखर कारखान्याची निवडणूक किसान क्रांती मंडळ लढविणार आहे, असेही काकडे यांनी सांगितले.

Web Title: ... so let's get Nagwade to retire politically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.