..तर घराजवळ फिरकणार नाही बिबट्या, अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 09:54 AM2024-02-01T09:54:32+5:302024-02-01T09:54:46+5:30
Leopard: बिबट्याची धास्ती नाही असा राज्यात एकही जिल्हा नाही. रात्री-अपरात्री बेसावध असताना बिबट्यांचे हल्ले होत आहेत.
- प्रमोद आहेर
शिर्डी (जि. अहमदनगर) -बिबट्याची धास्ती नाही असा राज्यात एकही जिल्हा नाही. रात्री-अपरात्री बेसावध असताना बिबट्यांचे हल्ले होत आहेत. त्यापासून संरक्षण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या औषधाची मात्रा वापरण्यात येणार असून त्या औषधाचा वास येताच बिबट्याच काय कोणताही वन्यप्राणी जवळ न येता पळून जाईल, सुमारे ४५ दिवस या औषधाचा वास टिकून राहील, विशेष म्हणजे हे सुरक्षित आहे, असा दावा हे औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने केला आहे.
धोका नाही
पुण्यातील मे. पेस्टोसिस एल. एल. पी. या कंपनीने बिबट्यांपासून संरक्षणासाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये बिबट्यांना प्रतिर्षित करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो.
या औषधापासून बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांना कोणताही धोका होत नाही. या औषधाच्या वासाने बिबट्यांना विशिष्ट प्रकारची संवेदना मिळून ते त्या भागातून दूर राहतात असे पेस्टोसिसचे संस्थापक अविनाश साळुंके यांनी सांगितले़.
वन्यप्राणी जवळ येत नसल्याचा दावा
या औषधामुळे वन्यप्राणी घरे आणि शेताच्या परिसरापासून दूर राहतात. निर्जन व जंगलातून जाताना एखाद्या व्यक्तीने या औषधाचा आपल्या कपड्यांवर अत्तरासारखा वापर केला तर वन्यप्राणी त्याच्याजवळ येत नाहीत, असा दावा अविनाश साळुंके यांनी केला आहे.
प्रयोगासाठी शासनाने दिली अनुमती
- हे एक बिनविषारी आणि वासावर आधारित तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर माकड, डुक्कर, उंदीर, साप, पक्षी आणि रानटी पशू यांसारख्या वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. या पद्धतीचा वापर आधीच रायगड, अमरावती, रत्नागिरी या जिल्ह्यांसह हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये डुक्कर, माकड अशा वन्यजीवांसाठी करण्यात आला आहे.
- जिल्ह्यातही वन्यजीवांचा उपद्रव कमी करण्यासाठी पेस्टोसिसला हा पथदर्शी प्रयोग करण्यासाठी शासनाने अनुमती दिली आहे.