मयत सफाई कामगाराच्या कुटुंबासाठी धाऊन आला समाजकल्याण विभाग; तातडीने १० लाखांची मदत 

By चंद्रकांत शेळके | Published: May 4, 2023 01:58 PM2023-05-04T13:58:29+5:302023-05-04T13:58:42+5:30

अंजनाबाई यांनी या मदतीबद्दल शासनाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

Social welfare department rushes to family of dead sweeper; 10 lakhs immediately | मयत सफाई कामगाराच्या कुटुंबासाठी धाऊन आला समाजकल्याण विभाग; तातडीने १० लाखांची मदत 

मयत सफाई कामगाराच्या कुटुंबासाठी धाऊन आला समाजकल्याण विभाग; तातडीने १० लाखांची मदत 

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबळक येथे सेप्टीक टँक साफ करताना मृत्यूमुखी पडलेल्या अरूण श्रीधर साठे या सफाई कामगाराच्या कुटुंबाला जिल्हा दक्षता समितीच्या शिफारशीने समाजकल्याण विभागाने तातडीने १० लाखांची मदत सुपूर्द केली. मयत अरूण साठे यांच्या आई अंजनाबाई साठे यांच्या बँक खात्यात १० लाख रूपयांची मदत वर्ग करण्यात आली. अंजनाबाई यांनी या मदतीबद्दल शासनाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम २०१३ या कायद्याने दुषित गटारामध्ये सफाई करताना कामगारांचा मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा दक्षता समितीमार्फत या प्रकरणांचा आढावा घेण्यात येत असतो. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त या समितीचे सदस्य सचिव असतात. त्यामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे असते. 

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशान्वये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी मयत अरूण साठे यांच्या कुटुंबाच्या मदतीबाबत तत्परतेने कार्यवाही केली. शासनाकडून निधी प्राप्त करून घेऊन मयत यांची आई अंजनाबाई साठे यांच्या वैयक्‍तिक बँक खात्यावर १० लाख रूपयांची मदत वर्ग करण्यात आली. देवढे यांनी अंजनाबाई यांची त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेतली असून शासनाच्या मदतीबाबत माहिती दिली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावर अंजनाबाई यांनी शासनाकडून तत्परतेने मिळालेल्या मदतीबाबत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.

Web Title: Social welfare department rushes to family of dead sweeper; 10 lakhs immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.