नगरमध्ये समाजकल्याण अधिका-याला काळे फासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:43 PM2017-12-02T15:43:32+5:302017-12-02T15:44:16+5:30
राज्यातील शोषित, वंचित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न मार्गी लावा, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून सुरज दुर्गिष्ट या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याने शनिवारी चर्मकार उठाव संघाच्या वतीने जिल्हा समाजकल्याण अधिका-याला काळे फासण्यात आले.
अहमदनगर : राज्यातील शोषित, वंचित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न मार्गी लावा, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून सुरज दुर्गिष्ट या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याने शनिवारी चर्मकार उठाव संघाच्या वतीने जिल्हा समाजकल्याण अधिका-याला काळे फासण्यात आले.
सुरज शंकर दुर्गिष्ट (रा. तरवडी, ता. नेवासा) हा सामान्य मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी असून, त्याची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. गावातील लोकांनी वर्गणी करून त्याच्या शिक्षणासाठी मदत केली. त्याला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून चर्मकार संघाने जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडे पाठपुरावा केला. सप्टेंबर २०१७मध्ये समाजकल्याण अधिका-यांना निवेदन देऊन शिष्यवृत्ती मिळावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला होता. परंतु गेल्या अडिच महिन्यांपासून यावर काहीही कार्यवाही न झाल्याने अखेर शनिवारी चर्मकार संघाच्या कार्यकर्त्यांनी बोल्हेगाव फाटा येथील जिल्हा समाजकल्याण गाठले. सुरज हा हुशार विद्यार्थी आहे, परंतु केवळ पैशाअभावी त्याला शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. त्याला अद्याप एका रूपयाचीही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे, तसेच प्रस्तावित जुगाडू व्यवस्थेमुळे राज्यातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. याविरूद्ध जाहीर उठाव आंदोलन करून कार्यकर्त्यांनी समाजकल्याण अधिकारी पांडुरंग वाबळे यांच्या अंगावर शाई टाकून काळे फासले. आंदोलनात अशोक कानडे, विजय घासे, बाळासाहेब गायकवाड, गौतम सातपुते, बाळासाहेब भोसले, रावसाहेब कानडे, माणिकराव नवसुपे, संतोष कानडे, प्रकाश पोटे, रामेश्वर सिंह, सोपान वाढे आदींहस कार्यकर्ते सहभागी झाले होते.