समाजकार्याची सुरूवात स्वत:पासून करावी - डॉ. संजय भट्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 08:10 PM2018-02-25T20:10:45+5:302018-02-25T20:30:00+5:30
समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय भट्ट यांनी केले.
येथील बी.पी.एच.ई. सोसायटीचे सी.एस.आर.डी. व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतातील समाजकार्य पद्धती : आव्हाने व नावीन्यता’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. जेमोन वर्गीस, प्रा. सुरेश मुगुटमल आदी उपस्थित होते. प्रारंभी वर्गीस यांनी राष्ट्रीय परिषदेचा अहवाल मांडला. सामाजिक न्याय, कंपन्यांची सामाजिक बांधिलकी, आदर्श गाव, वंचितांचे प्रश्न, सामाजिक अस्थिरता, महिलांवरील अन्याय, अत्याचार, मानवाधिकार, आधुनिक शिक्षण पद्धती,आदिवासी समुदायाच्या समस्या, सांस्कृतिक विविधता, समाजकार्य शिक्षणातील क्षेत्रकार्याची भूमिका, ग्रामीण विकासात लोकांचा सक्रिय सहभाग, शाश्वत विकास, पर्यावरणाचे प्रश्न, सामाजिक एकात्मता व सामुहिक जबाबदारी अशा अनेक विषयांवर परिषदेत विचारमंथन झाले.
सुरेश पठारे यांनी परिषदेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर विचारमंथन करून पुढील काळात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे ठरले. परिषदेत अनेक विचारवंताशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यातून समर्पित समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली, असा अभिप्राय विद्यार्थी राहुल सरवदे, दिल्ली येथील डॉ. अतुल प्रताप यांनी दिला.