साकळाई सिंचन योजना : 32 गावातील शेतकरी रस्त्यावर, चिखलीत रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 02:01 PM2019-02-03T14:01:14+5:302019-02-03T14:01:31+5:30
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात सुमारे 32 गावांचे भविष्य असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कृती समितीच्या वतीने चिखली येथील जुना टोल नाका येथे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
श्रीगोंदा : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात सुमारे 32 गावांचे भविष्य असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कृती समितीच्या वतीने चिखली येथील जुना टोल नाका येथे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सुमारे तीन हजार शेतकरी सहभागी झाले होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.
साकळाई उपसा सिंचन योजना समितीचे अध्यक्ष झेंडे महाराज म्हणाले, आतापर्यत पुढा-यांनी भुलथापाच मारल्या आहेत. जनतेला झुलवत ठेवण्याचे काम सरकारने केले आहे. शेतक-याच्या लढ्यात नगर - श्रीगोंदा तालुक्यातील पुढा-यांनी लढ्यात सहभाग न घेतल्यास त्यांचाही समाचार घेऊ असा इशारा त्यांनी दिला. आमदार राहुल जगताप म्हणाले, साकळाई योजना पूर्ण करण्यासाठी यापूर्वीही विधानभवनात आवाज उठवला आहे. या अधिवेशनातही आवाज उठवणार आहे. योजनेसाठी पक्षाचे नेते शरद पवार यांची सर्व मदत मिळवून देऊ. माजी सभापती बाळासाहेब हराळ म्हणाले, साकळाईसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या. नेत्यांच्या गाड्या आडवा. भाजपाचे नेते संतोष लगड म्हणाले, योजना मार्गी न लागल्यास सर्व पक्षातील नेत्यांनी पदाचे राजीनामे दिले पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी यावेळी लोकपाल व लोकायुक्त साठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा ठराव मांडला. ‘अण्णा हजारे हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत ठराव मंजूर केला.
यावेळी एकजूट करून लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळप्रसंगी पदाचे राजीनामे देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. १० फेब्रुवारी रोजी रुईछत्तीसी येथे नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडविण्याचा इशारा दिला.
यावेळी जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर, सभापती पुरुषोत्तम लगड, दादाभाऊ चितळकर, रामदास झेंडे, रवींद्र भापकर, सरपंच ज्ञानेश्वर कवडे, शरद बोठे, संजय धामणे, सरपंच अण्णा चोभे, सरपंच प्रवीण कोठुळे, नारायण रोडे, शरद चोभे, लहू कासार उपस्थित होते.