वाहनचालक प्रश्नावर लवकरच तोडगा काढू
By Admin | Published: August 27, 2014 11:00 PM2014-08-27T23:00:10+5:302014-08-27T23:09:08+5:30
रिक्षा चालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू ,अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
राहाता : वाहनचालक परवान्याविषयी परिवहन विभागाने शिक्षणाची टाकलेली अट शिथील करण्याबाबत आपण परिवहनमंत्र्यांशी चर्चा केली असून, याबाबत योग्य तो मार्ग काढून रिक्षा चालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू ,अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
शिर्डी शहरात ईद मिलनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विखे बोलत होते. शहराचे उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, माजी उपनगराध्यक्ष कैलास सदाफळ, मौलाना सय्यद, मौलाना इब्राहीम, मौलाना अजगारी, सोपानराव सदाफळ, अॅड. रघुनाथ बोठे, गोपीनाथ गोंदकर, विष्णू थोरात, बाळासाहेब जपे, विनायक निकाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश निकाळे, तहसीलदार दळवी आदी याप्रसंगी उपस्थित होते.
विखे म्हणाले की, सबका मालिक एक अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या पुण्यभूमीत आपण सर्वजण एकत्रितपणे नांदत आहोत. मुस्लिम समाजाच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने पुढाकार घेतला. शालेय शिक्षणमंत्री पदावर असताना राज्यात उर्दू शाळांना नवीन चेहरा प्राप्त करून देण्यासाठी आपण सातत्याने निर्णय घेतले. स्वतंत्र शिक्षण संचालक नेमून चार हजार उर्दू शाळांना अनुदान प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला़ शिक्षण हीच शक्ती आहे असे मानून वेगवेगळ्या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या. प्रवरा शिक्षण संकुलातून डॉक्टर आणि अभियंता झालेले अल्पसंख्यांक विद्यार्थी आता राज्यात ठिकठिकाणी यशस्वीपणे काम करीत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतानाच राहाता शहरात कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा आपण निश्चितच विचार करू, असे ते म्हणाले. (वार्ताहर)
रिक्षा बंद करण्याच्या निर्णयासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आपण चर्चा केली. मात्र परिवहन विभागानेच वाहन चालक परवान्यासाठी आता शिक्षणाची अट घातलेली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांची भेट घेतली असून, लवकरच यावर तोडगा काढू़
-राधाकृष्ण विखे,
कृषिमंत्री